श्रीनगर येथील समस्यांची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी
बेळगाव : महापौर-उपमहापौरांनी शहर व उपनगराचा फेरफटका मारून समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. कोनवाळ गल्ली, बॅ. नाथ पै सर्कल, बसवेश्वर सर्कल, महात्मा फुले रोडनंतर आता श्रीनगर येथील समस्यांची महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून तातडीने त्यावर कार्यवाही करण्याची सूचना केली. शहर व उपनगरातील समस्या सोडविण्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी मागणी केली होती. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारींची सफाई करण्यात यावी, अशी मागणी करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
त्यानुसार तातडीने महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी कोनवाळ गल्लीतील नाला, महात्मा फुले रोडवरील गटारी, बॅ. नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारी आणि तेथील नाल्याची पाहणी केली होती. तातडीने नाला व गटारींची सफाई करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यानंतर श्रीनगर येथेही गटारी तुंबल्याने पावसाळ्यापूर्वी त्यांची सफाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महापौर-उपमहापौर व मनपा अधिकाऱ्यांनी श्रीनगरला भेट देऊन समस्यांची पाहणी केली. तसेच तातडीने कार्यवाही करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी मनपाचे सत्ताधारी गटाचे गटनेते अॅड. हणमंत कोंगाली उपस्थित होते.