महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मयंक’ एक्सप्रेस !

11:35 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2022 च्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये भारताला गवसला होता तो उमरान मलिकच्या रुपानं तफानी वेगवान गोलंदाज. त्याला भारतीय संघात संधी मिळूनही दिशा व टप्पा याबाबतीतील समस्यांवर मात करू न शकल्यानं तो फारसा ठसा उमटवू शकला नाही...त्यानंतर दोन वर्षांनी यंदा त्याच स्पर्धेतून उभरलेला अन् वेगामुळंच सनसनाटी माजवून गेलेला मयंक यादव वेगळा ठरण्याची चुणूक दाखवू लागलाय. सातत्यानं ताशी 150 किलोमीटर वा त्याहून जास्त गतीनं मारा करण्याची ताकद बाळगणाऱ्या या गोलंदाजानं नुकतीच आपली धार दाखवून दिलीय ती बांगलादेशी फलंदाजांना...

Advertisement

‘त्याला’ प्रचंड वेगानं अक्षरश: साऱ्या भारतात प्रसिद्ध केलंय...परंतु दस्तुरखुद्द ‘तो’ पक्कं जाणून आहे की, भारतीय संघातील स्थान कायम करण्यासाठी गरज आहे ती गतीबरोबरच सातत्याची. त्यानं कारकिर्दीत दुखापतींमुळं अनेक वाईट क्षणांचं दर्शन घेतलंय...दिल्लीच्या त्या वेगवान गोलंदाजानं ‘आयपीएल’मधील सर्वांत वेगानं टाकलेल्या दहा चेंडूंची नोंद केलीय अन् गती राहिलीय ताशी 150 किलोमीटर्सपेक्षा जास्त. नुकतेच बांगलादेशचे फलंदाज सुद्धा त्याच्यापुढं लटपटल्याशिवाय राहिले नाहीत...भारताचा नवीन ‘स्पीडस्टर’ मयंक यादव !

Advertisement

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच षटकात एकही धाव न देणाऱ्या त्या गोलंदाजानं पहिल्या ‘टी-20’ सामन्यामध्ये चार षटकांत 21 धावांत 1 बळी, तर दुसऱ्या लढतीतही मिळविला तो 30 धावा देऊन 1 बळी. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही सामन्यांत मयंकला दुखापतींचा त्रास होतोय असं अजिबात दिसलं नाही. खुद्द तो म्हणतोय, ‘मी अतिशय उत्साही आहे, परंतु त्याचबरोबर ‘नर्व्हस’ देखील. कारण पुनरागमन केलंय ते तीन-चार महिन्यांनंतर. मला स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची फारशी संधी मिळालीच नाही. पण निवड समितीनं संघात समावेश करून अक्षरश: धक्काच दिला’...

मयंकला बांगलादेशविरुद्धच्या ‘टी-20’ मालिकेसाठी निवड झाल्याची बातमी कळली ती ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’मध्ये (एनसीए) जेवत असताना...‘मला काहीही माहीत नव्हतं. परंतु अचानक सहकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करायला प्रारंभ केला. मग मी पाहिली ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वेबसाईट आणि माझी निवड झाल्याची गोड बातमी मिळाली’, त्याचे शब्द...21 वर्षांचा मयंक यादव कारकिर्दीत बांगलादेशविरुद्धच्या दोन ‘टी-20’ लढती खेळलाय तो फक्त एक प्रथम श्रेणी सामना नि 17 ‘अ’ गटातील लढती एवढ्याच पुंजीच्या बळावर...14 लढती तो दिल्लीतर्फे खेळलाय, तर ‘आयपीएल’मध्ये ‘लखनौ सुपर जायंट्स’कडून अवघे चार सामने, परंतु तेही त्याच्या गतीचा गाजावाजा घडविण्यास पुरेसे ठरले...

‘आयपीएल’मध्ये ‘लखनौ’तर्फे मयंक यादवनं सतत दोन सामन्यांत सामनावीर पुरस्कार मिळविला होता. परंतु त्याच्या दर्जेदार सुरुवातीला ग्रहण लागलं ते ‘अॅबडोमिनल स्ट्रेन’चं. त्यामुळं त्याला ‘नॅशनल क्रिकेट अकादमी’मध्ये बराच काळ घालवावा लागला...मयंकचं प्रमुख शस्त्र हे वेगच असलं, तरी त्याला माहीत आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ त्याच्या जेरावर टिकाव लागणं कठीण. तिथं गरज असते ती अचूक टप्प्याची अन् तोच त्याला यशस्वी बनवू शकेल...‘लाईन नि लेंग्थ अतिशय महत्त्वाची. कारण त्यामुळं फलंदाजांकडून तुम्हाला आदर मिळतो. हल्ली मी लक्ष केंद्रीत केलंय ते त्याच्यावरच. ‘आयपीएल’ सुरू असताना मी कमी गतीनं चेंडू टाकण्यावर फारसा भर देत नव्हतो. कारण तिथं गरज होती गतीची. कर्णधार के. एल. राहुलनं देखील मला वेगाचाच वापर करण्याचा सल्ला दिला होता’, मयंक म्हणतो...मात्र बांगलादेशविरुद्धच्या लढतींत कमी गतीनं टाकलेल्या चेंडूंचा त्यानं उत्कृष्ट पद्धतीनं आधार घेतला. ‘जर खेळपट्टी मदत करत असेल, तर मी प्रयोग करण्यावर फारसं लक्ष देत नाही’ मयंक यादवचे शब्द !

‘सोनेट क्लब’ ते भारतीय संघ...‘वेगवान’ प्रवास !

प्रशिक्षकांचे सल्ले...

भारताचे आजवरचे सर्वांत वेगवान गोलंदाज...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article