For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायेने अर्जुनाला भुरळ पाडली

06:25 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
मायेने अर्जुनाला भुरळ पाडली
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

संजय म्हणाला, शंख फुंकून युद्धाला सुरवात होणार तोच आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन कृष्णाला म्हणाला, दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ उभा कर म्हणजे मी युद्धासाठी तयार असलेल्या सर्व योद्ध्यांचे अवलोकन करीन. अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ आणून उभा केला. तेथे अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये त्याचे आजे, गुरु, मामा, बंधु, पुत्र, नातु, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही उभे असलेले पाहिले. हे सर्व आपले बांधवच आहेत असे पाहून अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यांच्याबद्दल उत्पन्न झालेल्या करुणेमुळे अर्जुनाच्या अंगातल्या वीरवृत्तीचा अपमान झाल्याने ती निघून गेली.

ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणिदारपणामुळे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विरवृत्तीला त्याच्या मनात उत्पन्न झालेले करुणेचे वर्चस्व सहन झाले नाही. त्यामुळे ती निघून गेली. धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. तो खेदयुक्त होऊन कृष्णाला म्हणाला, या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धीसुद्धा स्थिर नाही.

Advertisement

कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी। गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडे ।। 28।। शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती । गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ।। 29।। न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ।। 30 ।। कृष्णा मी पाहतो सारी विपरित चि लक्षणे । कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ।। 31 ।। नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे । राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि  ।।32।। ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती । सजले ते चि युद्धास धना-प्राणास सोडुनी ।। 33 ।। आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे । सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरू ।। 34।। न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज । विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ।। 35 ।।

श्लोकांच्या विवरणात माउली म्हणतात, खेदयुक्त होऊन अर्जुन कृष्णाला म्हणाला, या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिलेले नाही. माझे मन व बुद्धी स्थिर नाही. माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत. हे गांडीव धनुष्य धरणारा हात लुळा पडला आहे. त्यामुळे ते हातातून निसटून केव्हा गळून पडले हे मलाच कळले नाही. या मोहाने माझे हृदय घेरले आहे. तसं बघितलं तर अर्जुनाचे अंत:करण व्रज्राहूनही कठिण, दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर होते पण करुणेने त्याच्यावर कडी केली. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ज्याने युद्धात शंकरास जिंकले, निवात-कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले.

कोणत्याही प्रकारचे कोरडे लाकूड पोखरून टाकणारा भुंगा कोवळ्या कळीमध्ये अडकून पडतो. तेथे एकवेळ तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेले आंधळे प्रेम कमळाच्या पाकळ्याप्रमाणे कोवळे असले तरी महाकठिण होते. हे आंधळे प्रेम परमात्म्याच्या मायेच्या शक्तीचा चमत्कार असतो. तिचे आकलन ब्रह्मदेवालाही होत नाही. अशा त्या मायेने अर्जुनाला भुरळ पाडली.

क्रमश:

Advertisement
Tags :

.