महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामार्गावरील प्रवास पुढील वर्षी तरी सुखकर होऊदे...

06:15 AM Sep 07, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खाचखळग्यातून आदळत, आपटत  प्रवास करत कोकणातील गावांत दाखल झालेला चाकरमानी सोमवारी घरगुती गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागला आहे. दरवर्षीच्या महामार्गावरील खडतर प्रवासाला वैतागलेल्या चाकरमान्यांनी पुढील वर्षी तरी महामार्गावरील प्रवास सुसहय़ होऊ दे, त्यासाठी आतापासूनच पाठपुरावा करण्याची सुबुध्दी कोकणचे नेते, भाग्यविधाते समजणाऱया सर्वांनाच दे अशी प्रार्थना गणराजा चरणी केली आहे.

Advertisement

गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे कोकणातील महत्त्वाचे सण. मात्र या दोन्ही सणापैकी सर्वाधिक गणेशोत्सवाला दरवर्षी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिह्यात लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाला येतात. यावर्षी 31 ऑगस्टला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. गेली दोन वर्षे कोरोना लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर मुंबई, पुणेकर चाकरमान्यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवाला मोठय़ाप्रमाणात हजेरी लावली. एरव्ही सुनी सुनी असलेली गावे आणि कुलूपबंद असलेली कोकणातील घरे या उत्सवाच्या निमित्ताने गेले आठवडाभर गजबजून गेली. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करत असल्याने शहरांपेक्षा गावोगावच्या उत्सवात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. कामानिमित्त मुंबईसह इतर शहरांत असणारे चाकरमानीच नव्हे तर देश-विदेशातूनही अनेकजण आपल्या गावी आल्याने या उत्सवाला इतर सणापेक्षा एक वेगळाच रंग यावर्षी चढलेला दिसला.

Advertisement

दरम्यान, घरगुती गणपतीचे सोमवारी दुपारनंतर विसर्जन झाल्यानंतर गावाला आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एस.टी. बसेस, खासगी वाहनांनी मुंबई-गोवा महामार्ग सोमवारी रात्रीपासून गजबजून गेला आहे. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगाच्या रांगा पहायला मिळतात. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने मोठया प्रमाणात गाडया सोडल्याने रेल्वे स्थानके, तसेच एस.टी. महामंडळानेही परतीच्या प्रवासासाठी अधिकाअधिक बसेस सोडल्याने एस.टी. बसस्थानके चाकरमान्यांच्या गर्दीने तुडूंब भरून गेली आहेत. याचबरोबरच ज्याना आरक्षण मिळाले नाहीत त्यांनी खासगी वाहनांकडे मोर्चा वळवल्याने तेथेही गर्दी पाहायला मिळत आहे. यातच खासगी वाहतूकदारांची अव्वाच्या सव्वा दर आकारून चाकरमान्यांची लूट सुरू केली आहे. मात्र तरीही या सर्व समस्येतून मार्ग काढत चाकरमानी आपले घर गाठताना दिसत असल्याचे चित्र कोकणात सर्वच तालुकास्तरावर दिसत आहे.

कोकणात कोकण रेल्वेनंतर एकमेव सुरक्षित प्रवास म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाचा आहे. मात्र कोकणातून जाणाऱया या महामार्गाचे गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरण रखडलेले आहे. काही महामार्गावर पेणपासून सिंधुदुर्गपर्यत चौपदरीकरणाचे काही टप्पे पूर्णत्वास गेलेले असले तरी रखडलेल्या टप्प्यांमध्ये पावसाळय़ात पडणारे खड्डे दरवर्षी गणेशोत्सवात येणाऱया चाकरमान्यांना तापदायक ठरत आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव जवळ आला की या महामार्गावरील खड्डे सर्वांनाच आणि त्यामध्ये विशेषकरून राजकीय मंडळीना अधिक दिसू लागतात. दरवर्षीची ही बोंब आहे. मग खासदार, आमदार बांधकाम मंत्र्यांबरोबर बैठका घेतात. मंत्री गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आदेश देतात आणि मग या आदेशानुसार स्थानिक प्रशासन महामार्ग कंत्राटदार कंपन्यांकडून खड्डे भरून घेतात. हे खड्डे भरणे म्हणजे एकप्रकारे मलमपट्टीच असते. कारण भरलेले खड्डे पूर्ण गणेशोत्सव काळातदेखील टिकत नाहीत. त्यामध्येच पाऊस कोसळला तर मग अधिक बोलायलाच नको. अशी परिस्थिती असल्याने दरवर्षीचे आगमन आणि परतीचा प्रवास हे दोन्ही गणेशोत्सवात काळात चाकरमान्यांना नकोसे झालेले आहे. वर्षावर वर्ष निघून जात असताना चौपदरीकरण मात्र काही केल्या पूर्ण होण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुंबई-गोवा सोडला तर इतर ठिकाणचे महामार्ग एकीकडे पूर्ण होत असतानाच कोकणातील मार्ग का रखडतो, याचे उत्तर कोकणी माणसाला शोधूनही सापडताना दिसत नाही.

सोमवारी गणेश विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा आलेल्या त्याच खड्डेमय मार्गावरून परतीच्या प्रवासाला निघताना ते मनोमन प्रार्थना करत आहेत. दरवर्षीच्या या खड्डेमय प्रवासाला आता आम्ही कंटाळलो आहोत, पुढील वर्षी तरी येताना महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन आमचा प्रवास सुखकर कर असे बाप्पाला साकडे घालत आहेत. मुळातच कारणही आता तसेच आहे. रेल्वे, एस.टी. बसचे आरक्षण मिळत नाही, मिळेल त्या वाहनाने गर्दीत जायचे तर वृध्दांना रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे घरी आणता येत नाही. त्यामुळे चौपदरीकरण पूर्ण झाले तर सहकुटुंब, सहपरिवार अधिक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करता येईल अशी प्रत्येकाची इच्छा आहे. 

तसे पाहिले तर मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 12 वर्षे उलटली तरी पूर्णत्वास गेलेले नाही. सिंधुदुर्गातील दोन्ही टप्पे, खेडमधील टप्पा सोडला तरी उर्वरीत ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. कशेडी बोगदाही यावर्षी वाहतुकीस खुला होईल असे वाटत होते. मात्र तेही काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे कोकणी माणूस आता या रखडलेल्या महामार्ग आणि येथील राजकीय नेतृत्वावर प्रचंड नाराज आहे. एकापेक्षा एक नेतेमंडळींची फळी कोकणात असतानाही कोकणचा एकमेव महामार्ग एवढी वर्षे रखडला याचेच त्याना आश्चर्य वाटते. विकासाबाबत लांबलचक भाषणे ठोकणारी नेतेमंडळी महामार्गाबाबतच थंड का पडतात याचे कोडे त्यांना सुटलेले नाही.

रायगडमधील सर्वेसर्वा सुनील तटकरे सध्या खासदार आहेत. त्यांनी माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे नेतृत्वही केलेले आहे. कोकणचे भाग्यविधाते म्हणूनही कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची कन्या आदिती तटकरे या काल परवापर्यंत राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात होत्या. महाडमध्ये गेली अनेक वर्षे आमदार असलेले शिवसेनेचे भरत गोगावले सध्याच्या शिंदे गटाचे प्रतोद आहेत. शिवसेना नेते अनंत गीते हे तर अनेक वर्षे केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले आहेत. खासदार म्हणून निवडून येत त्यांनी षटकारही मारला आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील भास्कर जाधव हे आता शिवसेनेचे नेते आहेत. माजी मंत्री तसेच त्यांनीही राज्यातील प्रबळ अशा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे. ते आक्रमक बोलतात. उदय सामंत हे सध्या उद्योगमंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक मंत्रीपदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. शिवसेना नेते रामदास कदम, विनायक राऊत, उपनेते राजन साळवी यासह वरील सर्व राजकीय नेतेमंडळी गेली 25 ते 30 वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रिय आहेत. मात्र या सर्वांना रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाची कोंडी गेल्या बारा वर्षात फोडता आलेली नाही हेच कोकणचे दुर्दैव आहे.

गणेशोत्सवाचे हे वर्ष आता उलटले, पुन्हा पुढच्या वर्षी त्यांच्या आगमनापूर्वी तरी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करायचे असेल तर कोकणातील आमदारांनी आतापासूनच कंत्राटदार आणि प्रशासनाच्या पाठीमागे लागणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या महामार्ग कामाचा प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन कामाची प्रगती, कामात येणाऱया अडचणी यांची सोडवणूक करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे झाले तर पुढील वर्षी अधिवेशनात भांडण्याची, महामार्गावर आंदोलन करण्याची आणि बांधकाम मंत्र्याबरोबर बैठक, पाहणी दौऱयाची वेळ येणार नाही हे मात्र खरे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article