निर्णय घ्या, अन्यथा आम्ही विचार करू
बलवंत सिंहची दयायाचिका : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेअंत सिंह हत्याप्रकरणातील गुन्हेगार बलवंत सिंह राजोआनाच्या दयायाचिकेवर केंद्र सरकारने विचार न केल्यास आम्ही करू असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. बेअंत सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बलवंत सिंह राजोआनाला दोषी ठरविण्यात आले होते.
न्यायाधीश बी.आर. गवई, पी.के. मिश्रा आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने राजोआनाच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. दया याचिकेवर निर्णय घेण्यास अत्यंत विलंब झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा आजीवन कारावासात बदलण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयासमोर करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजोआनाच्या याचिकेवर केंद्र, पंजाब सरकार आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासनाकडून उत्तर मागविले होते.
राष्ट्रपतींकडे प्रलंबित याचिका
राजोआनाची दयायाचिका राष्ट्रपती भवनात प्रलंबित असल्याचे केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्या, अन्यथा आम्ही राजोआनाच्या याचिकेवर विचार करू असे खंडपीठाने म्हटले आहे. दयायाचिकेवर निर्णय होईपर्यंत राजोआनाच्या मुक्ततेची मागणी त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी केली आहे. राजोआना 29 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याची दया याचिका मागील 12 वर्षांपासून राष्ट्रपती भवनात प्रलंबित आहे, यामुळे त्याला 6 किंवा 3 महिन्यांसाठी मुक्त केले जावे असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला. तर पंजाब सरकारने याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आणखी मुदत देण्यात यावी अशी विनंती केली.
1995 मध्ये मुख्यमंत्र्यांची हत्या
31 ऑगस्ट 1995 रोजी चंदीगडमध्ये झालेल्या स्फोटात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह आणि अन्य 16 जण मृत्युमुखी पडले होते. याप्रकरणी जुलै 2007 मध्ये एका विशेष न्यायालयाने राजोआनाला दोषी ठरवत मृत्युदंड ठोठावला होता.