For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होळी-रमजान सण सर्वांनी शांततेत साजरा करा

10:53 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
होळी रमजान सण सर्वांनी शांततेत साजरा करा
Advertisement

पोलीस आयुक्तांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन : पाण्याचा गैरवापर टाळावा 

Advertisement

बेळगाव : होळी सणाबरोबरच रमजान ईदही सुरू राहणार आहे. त्यामुळे दोन्ही धर्मियांनी हे सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीस समुदाय भवन येथे बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त इडा मार्टिन, उपायुक्त रोहन जगदीश यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सूचना केल्या आहेत. धूलिवंदनादिवशी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे सकाळी 9 ते 10 यावेळेत रंगोत्सव खेळण्याचे थांबवावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा. विद्यार्थ्यांवर कोणीही रंग फेकू नये, अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली आहे. यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा पाण्याचा गैरवापरदेखील टाळावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले. संवेदनशील भागामध्ये बॅरिकेड्स लावणे, त्याचबरोबर बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुनील जाधव यांनी केली. काही भागामध्ये विविध धर्मियांनी आपले ध्वज लावले आहेत. ते ध्वज दोन दिवसात काढावेत. जेणेकरून त्यावर कोणत्याही प्रकारचा रंग उडता कामा नये. चुकून एखाद्यावेळी रंग उडाला तर वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा ते ध्वज हटवावेत, अशी मागणीही करण्यात आली. नेताजी जाधव यांनीही यावेळी पाण्याचा वापर जपून करावा. रासायनिक रंगांचा वापर टाळावा, असे आवाहन केले. पोलीस प्रशासनाने रंगोत्सवासाठी दुपारी 1 पर्यंत वेळ दिला आहे. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी किमान दुपारी 2 पर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी केली. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अमित पेटणेकर, जयतीर्थ सौंदत्ती, रमेश सोनटक्की, गुन्हे अन्वेषण विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., मार्केटचे एसीपी सोमगौडा जे. यु. यांच्यासह खडेबाजार, मार्केटचे पोलीस निरीक्षक व शांतता समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.