महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेदनेचे ‘मॅक्सवेल’ महाकाव्य!

06:27 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेदनेची किनार असलेले विजय अनेकदा महाकाव्याचे रूप घेतात आणि अजरामर होऊन जातात. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने पायात गोळे येऊन वेदनेने विव्हळत असताना टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, नाबाद 201 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाच्या विजयाचा इतिहास लिहिला! ही खेळी आता जगातील एक अव्वल खेळी ठरली आहे. तर मॅक्सवेल जगाच्या आणि क्रिकेट इतिहासात अमर झाला आहे. कपिल देव आणि व्हिवियन रिचर्ड यांच्या 1983 आणि 1984 च्या विक्रमी खेळीनंतर 40 वर्षांनी त्यांच्या कारनाम्यांवर मात करणारी ही एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सलामीलाही न येता द्विशतक झळकावून विजय मिळवलेली अविश्वसनीय घटना प्रत्यक्ष घडली आहे. वानखेडे स्टेडियमवरील हजारो प्रत्यक्षदर्शी आणि जगभरातील कोट्यावधी दर्शक त्याचे साक्षीदार बनले आहेत. जगभर पुढील अनेक वर्षे या खेळीचे रिप्ले व्हिडिओ पाहून नवनवे क्रिकेटपटू घडतील आणि या चमत्काराला मागे टाकण्यासाठी धडपडतील. आपल्या संघाची वाताहत झालेली असताना आणि स्वत:ला धावणेही शक्य नसताना, वेदनेने विव्हळत मैदानावर लोळण घ्यावी लागली असताना त्याने जर मैदान सोडले असते तर त्याला कोणी चुकीचे ठरवले नसते. त्याची स्थितीच तितकी नाजूक होती. केवळ संघाची अवस्था बिकट झाली आहे हे पाहून एखादा आपल्याच कोशात अडकून पडला असता. पण इतिहास घडवण्यासाठी जे सज्ज झालेले असतात त्यांना अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची जबाबदारी नीयतीने आपल्यावर सोपवली आहे हेच माहीत असते. स्वत:च्या आत्मबळाच्या जोरावर जर असा एखादा व्यक्ती मैदानात ठामपणे उभा राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो, तो त्याच्यावर मात करू शकतो. मॅक्सवेलने आपल्या खेळातून हेच दाखवून दिले आहे. एकवेळ त्याच्या संघाची अवस्था 7 बाद 91 इतकी बिकट होती आणि 292 धावांचे आव्हान अफगाणिस्ताननं जणू त्याच्यासमोरच ठेवलेलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा या सामन्यात धक्कादायक पराभव होणार हे 91 टक्के प्रेक्षकांनी ठरवून टाकलं होतं.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या विजयाची आशा केवळ 9 टक्के आहे असं सगळ्या जगानं मान्य केलं होतं. पण मॅक्सवेलच्या झुंजार मनानं ते मान्य केलं नाही. जगाच्या विचाराच्या विरोधात जाऊन तो स्वत:शीच लढत होता. एकाच वेळी त्याची झुंज वेदनेशीही सुरू होती आणि मैदानावरील परिस्थितीशीही! निळ्या जर्सीत असलेल्या अफगाणी संघाशी निळ्या रंगामुळे भारतीय प्रेक्षकांची असलेली जवळीक आणि रशीद सारख्या खेळाडूवर असलेले प्रेम सचिन.... सचिन प्रमाणेच रशीद...रशीद असे पुकारून  भारतीयांनी दाखवून दिलेले होते. पण जेव्हा

मॅक्सवेल मैदानावर कोसळला, स्ट्रेचरवरून त्याला आता घेऊन जातील असे चित्र निर्माण झाले तेव्हा मॅक्सवेलने स्वत:ला सावरले आणि तो झुंजण्यासाठी सज्ज झाला. त्यावेळी समस्त भारतीय प्रेक्षकांनी त्याचा जयजयकार सुरू केला. प्रेक्षकांचा हा आवाज एखाद्या खेळाडूच्या अंतरात्म्याच्या आवाजाला बळ देऊन जातो. त्या बळावरच त्याने मात केली.

नीट धावताही येत नसताना जागेवर उभे राहून मोठे फटके लगावत त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आणि धावफलक हालता ठेवला. त्याच्याप्रमाणेच कौतुक झाले पाहिजे ते अफगाणिस्तानचे.त्यांनी कडवी झुंज दिली. पण मॅक्सवेलमुळे त्यांची झुंज एकाकी पडली. या सामन्यात अझमत ओमारझाईनं ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. पण मॅक्सवेलने त्याला हॅटट्रिक करू दिली नाही. त्याआधी इब्राहिम झादरानचं अफगाणी इतिहासातील ऐतिहासिक पहिले विश्वचषकातील शतक आणि रशीद खानच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर 5 बाद 291 धावा केल्या होत्या. या स्पर्धेच्या इतिहासातील अफगाणिस्तानची ही सुध्दा सर्वोच्च धावसंख्या ठरली. झादराननं नाबाद 129 धावांची सर्वोत्तम कामगिरी केली. सलामीला येऊन संपूर्ण 50 षटके त्याने फलंदाजी केली. झादराननं आपल्या संघाची एक बाजू लावून धरली. भारतीय  चाहते नेहमी निळ्या जर्सीतल्या खेळाडूंच्या पाठीशी राहतात.तसे ते अफगाणिस्तानच्या पाठीशीही राहिले हे विशेष. या सामन्यानं वानखेडेचं नाव पुन्हा इतिहासात नोंदवलं गेलं. या मैदानाचे नाव ज्या वानखेडे यांच्या नावावर आहे त्यांनी जिद्दीने दक्षिण मुंबईमध्ये हे मैदान उभं करून दाखवलं होतं. याच मैदानात सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याला साक्षी ठेवून अनेकांना यापुढे प्रेरणा मिळत राहणार आहे. पण याच ठिकाणी आणखी एक अदृश्य पुतळा आता उभा राहिला आहे तो आहे मॅक्सवेलचा. जेव्हा कधी या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना होईल तेव्हा तेव्हा मॅक्सवेलच्या विक्रमाची चर्चा होतच राहील. सचिनच्या पुतळ्याप्रमाणेच त्याच्या जागेवरून न घालता जखमी पायासह खेळण्याची स्तुती जग कायम करत राहील. आयसीसीच्या नव्या नियमामुळे त्याला रनर घेण्याची मुभा नव्हती आणि चांगले फटके मारायचे तर चांगले बदल आणि ते असले पाहिजे असे क्रिकेटचे जाणकार सांगत असतात. मात्र मॅक्सवेलने या मताला अंधश्रद्धा ठरवून दाखवले. एकाच जागी उभे राहून 21 चौकार आणि दहा षटकार त्यांनी ज्या लिलया मारले त्यावरून हा जखमी वाघ काही काळापूर्वी विव्हळत होता हे जग विसरून गेले. त्याच्या फटक्याने अफगाणिस्तानला घायाळ केले. क्रिकेटच्या विश्वचषकात गेली तेरा वर्षे भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी मिळालेली नाही. मात्र यावेळी भारताच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरी निश्चित झाली आहे. 1983 ला कपिलनंतर रिचर्डने 84 मध्ये तसाच विक्रम घडवला होता. आता मॅक्सवेलनंतर पुन्हा कोणीतरी नवे महाकाव्य रचावे....

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media
Next Article