मॅक्स हेल्थकेअरचा नफा वधारला
नफा 1.9 टक्के तेजीत : महसूलात 25 टक्के वाढ
नवी दिल्ली :
हेल्थकेअर क्षेत्रातील कंपनी मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूटने दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 1.9 टक्के आणि महसुलात 25.3 टक्के वाढ नोंदवली आहे. निकालानंतर बुधवारी 6 नोव्हेंबर शेअर्समध्ये हालचाल दिसून आली. सपाट सुरुवात झाल्यानंतर समभाग अर्ध्या टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.
मॅक्स हेल्थकेअरने शेअर बाजाराला माहिती दिली की, जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 1.9 टक्क्यांनी वाढून 281.81 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला 276.68 कोटींचा नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल 25.3 टक्क्यांनी वाढून रु. 1,707 कोटींवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1,363 कोटी रुपये होता.
कंपनीने म्हटले आहे की तिच्या तीन भागीदार आरोग्य सुविधा मॅक्स बालाजी हॉस्पिटल, मॅक्स स्मार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नवी दिल्लीतील मॅक्स साकेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकत्रित आर्थिक विवरणांमध्ये समाविष्ट नाहीत.
कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या सादरीकरणानुसार, तीनही रुग्णालयांचा आर्थिक निकालांमध्ये समावेश केल्यास, संपूर्ण कंपनीचा महसूल 2,119 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 349 कोटी रुपये इतका होतो.
निकालानंतर, बुधवारी मॅक्स हेल्थकेअरचा समभाग 1049 रुपयांवर व्यवहार करत होता. 5 नोव्हेंबर 2024 रोजी समभाग 1044 वर बंद झाला होता.