For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांना मॉरीशसचा पुरस्कार

06:55 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांना मॉरीशसचा पुरस्कार
Advertisement

संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध, अध्यक्ष गोखुल यांच्याशीही भेट आणि चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था / पोर्ट लुईस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरीशसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा त्या देशाचे नेते डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी केली. हा पुरस्कार ‘दी ग्रँड कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार अँड की ऑफ दी इंडियन ओशन’ या नावाने परिचित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मॉरीशसच्या दौऱ्यावर आहेत.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मॉरीशस येथे आगमन झाले. पोर्ट लुईस येथील विमानतळावर त्यांचे सोमवारी रात्री उशीरा भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मॉरीशसचे नेते नवीन रामगुलाम स्वत: विमाततळावर उपस्थित होते. मॉरीशसमधील भारतीय समुदायातील अनेकजणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेले होते. मॉरीशसचे सर्व 34 मंत्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

अनेक शतकांपासूनचे संबंध

भारत आणि मॉरीशस यांच्यात अनेक शतकांपासून संबंध आहेत. ब्रिटीशांच्या काळात भारतातून अनेक लोकांना या देशात वसविण्यात आले होते. त्यामुळे येथील बहुसंख्य जनता मूळची भारतीय वंशाची आहे. भारताचे या देशाशी प्रगाढ सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध असल्याने दोन्ही देश एकमेकांसाठी महत्वाचे आहेत. गेल्या सहा दशकांमध्ये या देशाशी भारताचे भक्कम आर्थिक संबंध विकसीत झाले आहेत. मॉरीशस हा देश छोटा पण समृद्ध देश आहे.

अध्यक्षांशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी मॉरीशसचे अध्यक्ष धर्मबीर गोखुल यांची भेट घेतली. त्यांनी गोखुल यांच्या पत्नी बृंदा यांना महाकुंभमेळ्यातील गंगाजलाचा गडू भेट दिला. बनारसी शालू भेट दिला. तसेच त्यांनी अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांना ओसीआय कार्डस ही भेट म्हणून दिले. दोन्ही नेत्यांनी अध्यक्षांच्या निवासस्थानी काहीकाळ विविध विषयांवर चर्चाही केली. आपली ही भेट दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे, असे वक्तव्य नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना उद्देशून केले.

आयुर्वेदिक उद्यानाला भेट

मॉरीशसमध्ये जगातील सर्वात मोठे आयुर्वेदिक वनस्पतींचे उद्यान आहे. ते शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यान या नावाने परिचित आहे. या उद्यानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तेथे त्यांनी बेलाच्या रोपाचे आरोपण केले. ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाच्या अंतर्गत ही लागवड करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह या देशाचे नेते नवीन रामगुलाम आणि अन्य मान्यवर होते. गयानाच्या दौऱ्यातही त्यांनी याच उपक्रमाच्या अंतर्गत रोपाचे आरोपण केले होते.

व्यापारी करारात सुधारणा होणार ?

भारत आणि मॉरीशस यांच्यात पूर्वीच व्यापार करार झाला आहे. या करारात सुधारणा करण्यात यावी असे मॉरीशसचे म्हणणे आहे. विशेषत: भारत आणि मॉरीशस यांच्यात दुहेरी कर लागू करण्याची पद्धती बंद केली जावी, यासाठी हा देश आग्रही आहे. तसे झाल्यास दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर विनासायास गुंतवणूक करु शकतील, असे तज्ञांचेही मत आहे. भारताशी चर्चा करताना हा विषय उपस्थित केला जाईल, असे प्रतिपादन या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री धनंजय रामफल यांनी केले. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे नेते नवीन रामगुलाम यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्या चर्चेत या मागणीवरही विचार केला जाईल, अशी शक्यता आहे. अन्य काही करार होणेही शक्य आहे. डॉ. नवीनचंद्र रामगुलाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष भोजन कार्यक्रम आयोजित करणार असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

पंतप्रधान मोदी यांचा संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरीशस या देशाशी संबंध 1998 पासूनचा आहे. ते त्यावेळी मोठ्या राजकीय पदावर नव्हते. त्यावर्षी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव या नात्याने त्यांनी या देशाचा दौरा केला होता. मोका येथील आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले होते.

Advertisement
Tags :

.