मौनी अमावास्या ठरली भाविकांसाठी ‘काळरात्र’
कुंभमेळ्यात अमृतस्नानावेळी चेंगराचेंगरीत 30 ठार, 60 जखमींवर उपचार, काही गंभीर
वृत्तसंस्था / प्रयागराज
प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात, मौनी अमावास्येच्या मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणखी साधारणत: 60 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमाध्ये उपचार केले जात आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिस्थितीवर लक्ष ठेवत असून काही काळाच्या खंडानंतर अमृतस्नानाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेसंबंधी तीव्र दु:ख आणि शोक प्रकट केला आहे. ज्या भाविकांनी आपले आप्तेष्ट या दुर्घटनेत गमावले, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून अमृतस्नानाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारित केला आहे. त्यांनी दिवसभर आदित्यानाथ यांच्याशी संपर्क ठेवला होता आणि ते स्थिती जाणून घेत होते.
निमुळत्या घाटावर दुर्घटना
त्रिवेणी संगमाचे ‘नाक’ समजल्या जाणाऱ्या निमुळत्या घाटावर मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्रीनंतर साधारणत: दीड वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. घाटावर उभी केलेली बॅरिकेडस् तुटल्यामुळे भाविकांचा लोंढा त्रिवेणी संगमात डुबकी घेण्यासाठी एकदम पुढे धावला. यावेळी काही भाविक घाटावरच झोपलेले होते. त्यांच्या अंगावरून अनेक भाविक पळत पुढे गेल्याने एकच गोंधळ माजला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत साधारणत: 30 भाविकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. मृत भाविकांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे. त्यांच्यात बेळगावचेही चार भाविक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्नान थांबविण्याचा निर्णय
ही दुर्घटना घडताच काही काळासाठी अमृतस्नान थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या तासातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सर्व 90 जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार होत असताना त्यांच्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला होता. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अमृतस्नानाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अमावास्येचा संपूर्ण दिवस अमृतस्नान सुरळीतपणे पार पडले, अशी माहिती प्रयागराज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
8 कोटींहून अधिक भाविक
मौनी अमावास्येच्या अमृतस्नानाची पर्वणी साधण्यासाठी दिवसभरात 8 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले, अशीही माहिती देण्यात आली आहे. या भाविकांमध्ये देशातील जवळपास प्रत्येक राज्यांमधून आलेल्यांचा समावेश होता. सर्वाधिक भाविक उत्तर भारतातील, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांमधील होते. त्रिवेणी संगम आणि त्याच्या नजीक असणाऱ्या 144 हून अधिक घाटांवर भाविकांच्या स्नानाची सोय करण्यात आली आहे. एकाच घाटावर गर्दी न करता सर्व घाटांचा उपयोग भाविकांनी स्नानासाठी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत 25 कोटी
महाकुंभ मेळ्याच्या प्रथम 15 दिवसांमध्येच कुंभात सहभागी झालेल्या भाविकांची संख्या 25 कोटींपर्यंत पोहचली आहे. हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत, अर्थात शिवरात्रीपर्यंत चालणार आहे. 50 कोटींहून अधिक भाविक एकंदरीतरित्या या पर्वणीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. असा महाकुंभमेळा प्रत्येक 12 वर्षांनंतर प्रयागराज येथे आयोजित केला जातो. ही पंरपरा सहस्रावधी वर्षांची आहे. यावेळी विक्रमी संख्येने भाविकांचे आगमन होईल हे गृहीत धरून प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली असून सर्वत्र कृत्रीम बुद्धिमत्ताधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे.
बॅरिकेड तुटले की मुद्दाम तोडले ?
ही दुर्घटना घातपातामुळे घडली आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ही शंका व्यक्त केली आहे. ही घातपाताची शक्यता गृहित धरुन या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे. काही भाविकांनी नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष केल्याने काही प्रमाणात गोंधळ झाला. तथापि, सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे मनुष्यहानी मर्यादित राहिली, असे प्रतिपादन प्रयागराजच्या प्रशासनाने केले आहे.

न्यायालयीन चौकशीचा आदेश
उत्तर प्रदेश प्रशासनाने या दुर्घटनेच्या व्यापक न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. न्या. हर्ष कुमार यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांच्या समितीची स्थापना यासाठी त्वरित करण्यात आली आहे. तसेच प्रयागराजचे स्थानिक प्रशानसही स्वतंत्र चौकशी करणार आहे. बॅरिकेडस् तुटण्याच्या घटनेचीही चौकशी केली जाणार आहे. ज्या भागात ही दुर्घटना घडली, तेथे आता अधिक सुरक्षा व्यवस्था नियुक्त करण्यात आली आहे. तसेच बॅरिकेड्स ही भक्कम करण्यात येत असून रात्री अधिक लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाची पत्रकार परिषद
या घटनेची अधिकृत माहिती देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने संध्याकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी घटनेत झालेली जीवीत हानी आणि इतर घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली. नंतर साडेसात वाजता योगी आदित्यनाथ यांनीही दुर्घटनेसंबंधी नवी माहिती दिली. जखमींवर उपचार केले जात आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. पुढील उपाययोजनांचीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच भाविकांनी यापुढे काय करावे, याचही माहिती त्यांना त्वरित देण्यात आली आहे.
अफवांमुळे दुर्घटना ?
मध्यरात्री चेंगराचेंगरी होत असल्याच्या अफवा पसविण्यात आल्या होत्या, अशी नवी माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात काहीही घडले नसताना अशा अफवा पसरविण्यात आल्याने भाविकांची धावपळ झाली. त्यामुळे अनेक भाविक तुडवले गेले, अशीही माहिती देण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण, चौकशीच्या नंतरच समजणार आहे, असे म्हणणे प्रशासनाकडून मांडले जात आहे.
साहाय्यता धनाची त्वरित घोषणा
या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या आप्तेष्टांना प्रत्येक मृतामागे 25 लाख रुपयांचा भरपाई निधी दिला जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. हा निधी त्वरित दिला जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च उत्तर प्रदेश प्रशासन करणार असून प्रत्येक जखमीला 6 लाख रुपये भरपाई घोषित करण्यात आली आहे. साहाय्यता कार्याची पाहणी सातत्याने केली जात आहे.

अर्ध्या तासात स्थिती नियंत्रणात
दुर्घटना घडत आहे, हे लक्षात येताच प्रशासनाने त्वरित हालचाली करण्यास प्रारंभ केला. सर्व भाविकांना घटनास्थळ सोडण्याचा आदेश देण्यात आला. तसेच तुटलेले बॅरिकेड पुन्हा स्थापित करण्यात आले. झोपलेल्या भाविकांना त्वरित उठविण्यात येऊन सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे त्वरित घाट रिकामा झाला. परिणामी, अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनीही दिली आहे.
हे प्रशासनाचे अपयश
उत्तर प्रदेश प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी सकाळी जेव्हा या दुर्घटनेची वृत्ते येण्यास प्रारंभ झाला, तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सोशल मिडियावर संदेश पोस्ट करण्यास प्रारंभ केला होता. ही दुर्घटना फारच भयानक आहे, असा सूर त्यांनी लावल्याचे दिसून आले. यासाठी त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. जनतेत आणि भाविकांमध्ये भयगंड पसरवून दुर्घटनेची तीव्रता आधिक वाढविण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता, असा प्रत्यारोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
ही पहिलीच दुर्घटना नव्हे...
महाकुंभमेळ्यातील ही प्रथम दुर्घटना नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. 1954 पासून 2025 पर्यंतच्या 60 वर्षांमध्ये अनेकदा अशा दुर्घटना होऊन भाविकांना जीवितहानी आणि वित्तहानीला तोंड द्यावे लागले आहे...
1954 : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत किमान 800 भाविकांचा तुडविले गेल्याने किंवा संगमात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.
1986 : हरिद्वार येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात किमान 200 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. तर हजाराहून अधिक भाविक जखमी झाले होते.
2003 : महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात गोदावरी नदीत डुबकी घेताना अनेक भाविक वाहून गेले. किमान 39 जणांचा मृत्यू झाला होता.
2013 : प्रयागराज (त्यावेळचे अलाहाबाद) येथील कुंभमेळ्यात रेल्वेस्थानकाची पायवाट तुटल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 42 भाविकांचा मृत्यू झाला होता.