राज्यातील सर्व शहरांत ‘मत्स्यवाहिनी’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : मत्स्योद्योग खात्यातर्फे नारळी पौर्णिमा उत्साहात
पणजी : राज्यातील पारंपरिक मच्छिमार बांधवांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वस्त दरात मासळी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मत्स्यवाहिनी’ ही सेवा पुढील काही काळात राज्यातील सर्व शहरात सुरू करण्याचा सरकारने विचार चालवलेला आहे. या योजनेअंतर्गत दुचाकी किंवा तीनचाकी देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यांचा वापर इतर कारणासाठी झाल्यास त्या पुन्हा काढून घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मत्स्योद्योग खात्यातर्फे आयोजित नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, संचालिका ड़ॉ. श]िर्मला मोंतेरो सचिव ई. वल्लभन, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.
बीएससी इन फिशरीज सायन्स
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पुढील शैक्षणिक वर्षापासून बीएससी इन फिशरीज सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. हा अभ्यासक्रम राज्यातच सुरू झाल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज पडणार नाही. शिवाय अनेक कौशल्यप्राप्त विद्यार्थी तयार होतील आणि मत्स्यव्यवसाय टिकण्यास मदत होईल.
नील क्रांतीचे स्वप्न पूर्ण करताना समुद्राची स्वच्छता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकांना निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या किंवा अन्य कचरा समुद्रात फेकण्याची सवय आहे. काही उद्योगही प्रक्रिया न केलेले पाणी थेट समुद्रात सोडतात. यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढत आहे. शिवाय असा कचरा मासळीच्या पोटात जाऊन तो पुन्हा आपल्या शरीरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या शुभदिवशी आपण सर्वांनी समुद्रात कचरा टाकणार नाही, अशी शपथ घ्यायला हवी, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. मंत्री हळर्णकर यांनी मत्स्योद्योग खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर हा व्यवसाय टिकावा यासाठी स्थानिकांनी खात्याच्या योजनांचा फायदा घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
युवकांनी मासेमारी व्यवसाय सांभाळावा
पूर्वी मासेमारी व्यवसायात केवळ गोमंतकीय लोक असायचे. परंतु आता काही स्थानिक लोकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने बाहेरील लोक त्याचा फायदा घेऊ पाहत आहेत. दारोदारी फिरून मासे विकणारी व्यक्ती कोकणीतून बोलत असे. आज मात्र वेगळीच भाषा ऐकायला मिळत आहे. हा व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातून जाऊ नये यासाठी गोमंतकीय व्यावसायिक व युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या व्यवसायात आर्थिक फायदा देखील आहे. सरकार व्यावसायिकांना सर्व ती मदत करण्यास तयार आहे, त्यामुळे मासेमारी व्यवसाय टिकून राहण्यासाठी स्थानिकांनीच पुढे यायला हवे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आवाहन केले.