पोलीस स्टेशनच्या बाँड्रीवर मटका बुकी अॅक्टीव्ह
कोल्हापूर :
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैद्य व्यवसाय बंद म्हणजे बंद अशी ठोस भूमिका घेतल्याने अवैद्य धंदे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मात्र एका मटका व्यवसायीकाने मात्र बिनधास्त मुंबई आणी कल्याण मटका सुरु ठेवला आहे. पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या हद्दीच्या वादाचा फायदा घेत मटका बुकींनी आपला धंदा सुरु केला आहे. हे मटका अड्डे नष्ट करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर आहे.
पोलीस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस दलाने मटका बुकींवर धडक कारवाई करत मुंबई मटका साम्राज्यास पोलीस दलाने सुऊंग लावला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई मटका कल्याण आणि मेन बाजार नावाने ओपन झाला आहे. गेल्या वर्षभरापासून मटका बंद असलेला मटका पुन्हा डोकेवर काढत आहे. मुंबई ऐवजी कल्याण आणि मेन बाजार नावाने मटका शहरासह जिह्यात पुन्हा खुलेआम पद्धतीने सुऊ आहे. नुतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पहिल्याच क्राईम मिटींगला अवैद्य धंद्यांविरोधात कडक पावले उचलण्याच्या सुचना दिल्या. मात्र काही मटका बुकींनी मात्र नामी शक्कल लढविल्याचे दिसत आहे. दोन पोलीस ठाण्यांमध्ये हद्दीचा वाद नेहमीच असतो. अपघात, चोरी काहीही घटना घडो हे घटनास्थळ आमच्याकडे नाही असे म्हणत नागरीकांना हेलपाटे मारण्यास लावण्याचे काम पोलीस करत असतात. याचाच फायदा मात्र मटका बुकी चालकांनी घेतला आहे. दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीवरच थेट मटका बुकी थाटून बुकींनी पोलिसांसमोर आवाहन निर्माण केले आहे.
- आता मोबाईलवर मटका
चिठ्यांवरचा मटका आता ऑनलाईन पद्धतीने सुऊ झाला आहे. पुर्वी चिठ्ठीवर केल्या जाणाऱ्या नोंदी, लावला जाणारा आकडा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. मटका बुकीचे प्रत्येक एरियामध्ये एजंट कार्यरत असून ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मटका स्विकारत आहेत. पेमेंट करण्यासाठीही ऑनलाईन पेमेंटचा वापर काही ठिकाणी केला जात आहे. मात्र अद्यापही शहराच्या काही भागात चिठ्यांवर मटका खुलेआम सुऊ आहे.
- डिबी पथकांची पुर्नरचनेची गरज
गुन्हे प्रकटीकरणात अपयश आणि अवैद्य धंद्यांचा फैलाव यामुळे जिह्यातील डीबी पथकांवर बरखास्त करण्याची नामुष्की यापूर्वी आली होती. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये काही पोलीस ठाण्यांच्या डिबी पथकांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे. या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यांची हद्दच माहिती नाही आहे. यामुळे याचा फायदा मटका बुकी घेत आहेत. यामुळे डीबी पथर्वे बरखास्त करुन त्यांची पुर्नरचना करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी मटका सुरु
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दूधकट्टा, कोळेकर तिकटी, संभाजीनगर कामगार चाळ, संभाजीनगर एसटीस्टँड, कपिलतीर्थ मार्केट या ठिकाणी तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगावेश सीग्नल नजीक, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, फोर्ड कॉनर्र, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, दांडगाईवाडी या ठिकाणी मटका जोमात सुरु आहे. तर शाहूपुरी परिसरात सदरबाजार, कदमवाडी, राजेंद्रनगर, एसटीस्टँड, व्हिनस कॉर्नर, बागल चौक, राजारामपुरी परिसरात राजेंद्रनगर, साळोखेनगर,, टेंबलाईवाडी, दौलतनगर, यादवनगर, उद्यमनगर या ठिकाणी मटका बुकी सुरु असल्याचे दिसत आहे.
- माहिती अधिकार, वकीलांकडून अर्ज करुन पोलिसांवर दबाव
मटका बुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर काही बुकी मालकांकडून दबाव टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. काही माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच वकीलांकडून त्या पोलिसांच्या विरोधात वरिष्ठांकडे अर्ज करणे, पोलिसांवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठीही दबाव टाकण्याचे काम बुकी मालकांकडून सुरु आहे. यामुळे काही ठराविक बुकींवर कारवाई करण्यास पोलीसही घाबरत असल्याचे दिसत आहे.
- सम्राट शांत, विजय फास्ट
पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मटक्याचे रॅकेट उद्धस्त केले होते. यानंतर सम्राट कोराणे याला जेरबंद केल्यामुळे सम्राटचे मटका रॅकेट पुर्णपणे थंडावले आहे. याचाच फायदा विजयने उचलला आहे. मटका रॅकेट पुर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचे काम विजयने सुरु केले आहे. पोलिसांनी जर कारवाई केलीच तर एका एजंटच्या जागी दुसरा आणि दुसऱ्याच्या जागी तिसरा अशी एझंटांची फौजच विजयने उभी केली आहे. कारवाईनंतर काही तासापुरता मटका बंद ठेवून दुसरा एजंट नेमून पुन्हा जोरात धंदा सुरु केला जात आहे. यामुळे या विजयने पोलीस यंत्रणेलाच आवाहन उभे केले आहे.
अवैद्य व्यवसायांवर त्या त्या पोलीस ठाण्याकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र तरीही शहरात काही ठिकाणी छुप्या मार्गाने अवैद्य व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अशा व्यवसायांवर धडक कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथक (डीबी) पथकांना सुचना देण्यात आल्या आहेत.
- अजित टिके, शहर पोलीस उपअधिक्षक