जागा वाटपाचे गणित
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रणवाद्ये आता जोरात वाजू लागली आहेत. गणपती व पक्ष पंधवड्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीच्या फटाक्यासोबत विधानसभा निवडणूक निकालांचे आणि सत्ता समीकरणानंतरच्या विजयाचे फटाके फुटतील अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षाच्या आणि सरकारी यंत्रणांच्या हालचाली दिसत आहेत. शरद पवार सतत हिंडत आहेत. डावपेचाची त्यांची आखणी अखंड सुरु आहे. पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा पूर्ण करुन आता विदर्भ दौऱ्याची आखणी केली आहे. अजितदादा पवार यांनीही लाडकी बहीण योजना पुढे करुन महाराष्ट्र पिंजून काढायला यात्रा सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटप आणि रणनिती यावर भर देत शिंदेंकडे महायुतीची कॅप्टनशिप सोपवली आहे. महाआघाडीत कुणीही लहान भाऊ, मोठा भाऊ नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रितपणे महायुतीला विशेष करुन भाजपा व शिवसेना शिंदे गटाला सत्तेवरुन दूर करणेसाठी मुठ आवळून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत असे सांगितले जात आहे. पण तसे दिसत नाही. महायुतीत विद्यमान सभागृहात भाजपाचे 105, शिवसेना शिंदे गटाचे 47 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. या जागा त्या-त्या पक्षाला सोडायच्या म्हटल्या तर 193 जागा अधिक काही अपक्ष अशा 200 जागांचे वाटप झालेच असे मानायला हरकत नाही. उरलेल्या 88 जागांसाठी ओढाओढी होणार आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जादा जागा मागणार हे अपेक्षित आहे. भाजपच्या पोटात सदाभाऊ खोत यांची शेतकरी संघटना, विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष व अन्य आहेत. त्यामुळे ही महायुती जागा वाटप कसे करते यावर महायुतीचे आणि निवडणूक निकालाचे भवितव्य ठरेल पण महायुतीतील कोणत्याही पक्षाला 145 हा जादुई आकडा गाठता येणार नाही. जी गोष्ट महायुतीची तीच गोष्ट महाआघाडीची होईल असे दिसते आहे. महाआघाडीत जागा वाटपात 170 हून अधिक जागा महाआघाडीचा मोठा भाऊ आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. शरद पवार यांनीही विधानसभेला आपणास चांगले यश मिळेल असा अंदाज आला आहे. सुमारे चाळीस युवकांना राष्ट्रवादी मैदानात उतरवणार असे दिसते आहे. काँग्रेसही तिकीट वाटपात शंभर जागा मागते आहे. राज्यातील प्रमुख सहा पक्ष आणि त्यांची जागा मागणीची इर्षा पाहता युती आणि आघाडी कसा आकार घेते आणि कोणाला कसे यश मिळते हे बघावे लागेल. प्रमुख सहा राजकीय पक्षांच्या त्यासाठी उठाबशा सुरु आहेत. शरद पवारांनी पाठोपाठ दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि या भेटी संदर्भात किंवा भेटीनंतरचा तपशिल उद्धव ठाकरे यांना न कळल्याने पवारसाहेब आमच्या कट्टर विरोधकांना का भेटत आहेत असा प्रश्न ठाकरे सेनेला पडला आहे. त्याच जोडीला उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी केलेला दिल्ली दौरा, काँग्रेसशी जमवून घेण्याची भूमिका आणि उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी सुरु केलेले लॉब्ंिांग यामुळे शरद पवार गटातही अस्वस्थता आहे. शरद पवार, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे कसलेले राजकारणी आहेत. वेळप्रसंगी हातात-हात घेत एकमेकांचे पाय ओढण्यात तरबेज आहेत. त्यामुळे कोणकोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार, कुणाला कात्रजचा घाट दाखवणार याबद्दल सर्वच छावण्यात सतर्कता आहे. भाजपाची सूत्रे अमित शहा आणि विनोद तावडे हालवत आहेत हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या वेळी झालेली आणि तिकीट वाटप जाहीर करण्यास झालेला उशीर टाळण्यासाठी अमित शहा सोबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या तीन-चार बैठका झाल्या आहेत. महाआघाडीतही मतदारसंघ निहाय आढावे घेतले जात आहेत. एकीकडे आघाड्या आणि युती यांची सूत्रे हालत असताना मनसे, जरांगे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही आमच्या पक्ष व संघटनेच्यावतीने 288 जागा लढवू अशी घोषणा करुन दौरे, यात्रा, मेळावे सुरु केले आहेत. राज्यातील मराठा समाज, ओबीसी समाज आणि मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात हाच महत्वाचा विषय आहे. 288 जागा लढवतो म्हणणे वेगळे व लढवणे वेगळे व जिंकणे तर फारच कठीण पण राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने ते दोघे मैदानात उतरलीत तर जरांगे-पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देत नाही तर ते हिसकावून घेऊ या भूमिकेतून निवडणूक मैदानात उतरतील. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपा व महायुतीला दणका दिला होता. ओघानेच त्यांचे कर्ते करवते म्हणून शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले जाते. आता 288 जागा उभा करताना जरांगे-पाटील काय भूमिका घेतात त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल पण राज्यात मोठ्या संख्येने असलेले ओबीसी मतदारही सजग झाले आहेत. ओबीसी उमेदवारालाच मतदान अशी त्यांची भूमिका आहे. ओबीसीच्या ताटात ते कुणालाही जेवायला बसू द्यायला तयार नाहीत. एकूणच मोठा तिढा आणि जातीय ध्रुवीकरण होताना दिसत आहे. त्याचा कुणाला कसा फायदा होणार आणि कोण जादुई आकडा गाठणार हे कुणीही सांगू शकत नाही. एकूणच महाराष्ट्राचा जातीपातीत चकणाचूर होणार असे वातावरण आहे. गेल्यावेळी जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले पण उद्धव ठाकरे यांनी मोदींचे बोट सोडून शरद पवारांचे बोट पकडले. यावेळीही निकालानंतर कोण कोठे जाईल हे सांगता येत नाही. राजकारणाचा चिखल झाला आहे. सर्वच बरबटलेले आहेत. काहीही करुन सत्ता आणि सत्तेतून सर्व हे धोरण झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थिर लोकमताचे आणि राज्याला पुढे नेणारे सरकार येईल, अशी शक्यता दिसत नाही. मैदानातील सारे मल्ल चिखलात, जातीत आणि स्वार्थात बरबटलेले आहेत. महाराष्ट्राची, देशाची चिंता आहे. अशा मतदारांनी या सर्व चिखलातून बाहेर येऊन महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा आणि पुढील पिढ्यांचा विचार करावा इतकेच आवाहन आहे. निवडणूक आयोगाने हरयाणा आणि जम्मू काश्मीर राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्राची घोषणा केलेली नाही. तूर्त जागा वाटप, मोठा भाऊ आणि मुख्dयामंत्रीपदाचा दावेदार या भोवतीच सर्वांनी फेर धरला आहे.