For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅरंटी योजनांचे गणित; मृणाल यांचा आत्मविश्वास द्विगुणित

11:01 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅरंटी योजनांचे गणित  मृणाल यांचा आत्मविश्वास द्विगुणित
Advertisement

‘तरुण भारत’ला दिली खास मुलाखत : ड्रिम प्रोजेक्ट राबविण्याचा निर्धार

Advertisement

बेळगाव : काँग्रेसने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांना उमेदवारी दिली आहे. रोजगारासह मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अनेक ड्रिम प्रोजेक्ट तयार केले आहेत. लोकांनी खासदार होण्याची संधी दिल्यास भविष्यात केल्या जाणाऱ्या प्रोजेक्टविषयी त्यांनी ‘तरुण भारत’शी संवाद साधत सविस्तर माहिती दिली.

काँग्रेसने दिलेल्या संधीचे सोने कसे करणार?

Advertisement

देशाची प्रगती ही युवकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. देशात बदल घडवायचा असेल तर युवकांशिवाय पर्याय नाही. याचाच विचार करून काँग्रेसने यावेळी अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. अधिकाधिक युवकांनी राजकारणात यावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. काँग्रेसने दिलेल्या या संधीचे निश्चितच सोने करून दाखविले जाणार आहे. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी युवा नेतृत्व सक्षम आहे.

इंजिनियरिंग केल्यानंतर राजकारणात येण्याची इच्छा कशी झाली?

बेळगावच्या जीआयटी कॉलेजमधून 2015 मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यापूर्वीच 2013 मध्ये माझी आई लक्ष्मी हेब्बाळकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली. महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे समाजकारण, राजकारण जवळून पाहता आले. लोकांचे प्रश्न सोडविल्यानंतर त्यातून मिळणारे समाधान या प्रेरणेतून राजकारणात आलो.

निवडून आल्यास ड्रिम प्रोजेक्ट काय असणार?

बेळगावमध्ये क्षमता असतानाही मोठे प्रोजेक्ट हुबळीला गेले, याला आपले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये मोठे प्रोजेक्ट आणून तरुणाईला रोजगार मिळवून देण्याचा पहिला प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केल्या जाणार असून नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण केले जाणार आहे.

गॅरंटी योजनांचा परिणाम दिसणार का?

सर्वसामान्य महिलांना आपले कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली गृहलक्ष्मी योजना सुरू करण्यात आली. आज महिन्याला दोन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. यामुळे नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. बेळगावमध्ये कोठेही गेले तरी घरातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.

तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडविणार?

बेळगावमध्ये मागील 20 वर्षात कोणताही मोठा प्रकल्प येऊ शकला नाही. याचा परिणाम तरुणाईच्या रोजगारावर झाला आहे. आजही स्थानिक परिसरात रोजगाराच्या चांगल्या संधी नसल्याने युवकांना बेंगळूर, मुंबई, पुण्याकडे वाटचाल करावी लागते. आज बेळगावमध्ये अनेक मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच सरकारी विद्यापीठे आहेत. परंतु, त्या मानाने रोजगार उपलब्ध नाहीत. याचा विचार आता तरुणाईनेही करणे गरजेचे आहे. एका तरुणाला खासदारकीची संधी दिल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल, याचा विचार तरुणांनी प्राधान्याने करावा.

मंत्री हेब्बाळकर, हट्टीहोळी यांच्या प्रचाराचा लाभ होणार का?

कोणताही प्रवास करताना सारथी तितकाच मजबूत असणे गरजेचे असते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. दोघेही रात्रंदिवस  मतदारसंघ पिंजून काढत आहेत. जनतेचा त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांच्या प्रचारामुळे मोठ्या फरकाने विजयी होईन.

राजहंसगडावरील शिवमूर्तीमुळे पर्यटनात भर

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्या आहेत. आजवर बेळगावमध्ये अनेक राजकारणी झाले. परंतु, बेळगावच्या विकासाकडे, बेळगावच्या पर्यटनाकडे त्यांनी कधी लक्ष दिलेच नाही. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून येळ्ळूरजवळील राजहंसगडावर सर्वात उंच शिवमूर्ती स्थापण्यात आली. यामुळे आज तेथे देशातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटक येत आहेत. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींकडून सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिर, गोकाकचा धबधबा, रामदुर्ग येथील शबरी मंदिर यांचा विकास न झाल्यामुळेच पर्यटनाला खीळ बसली आहे.

Advertisement
Tags :

.