मिझोरम फुटबॉलला ‘मॅच फिक्सिंग’चा धक्का
तीन क्लब, 24 खेळाडूंसह तीन क्लब अधिकाऱ्यांवर राज्य संघटनेकडून बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिझोरम राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी मिझोरम फुटबॉल असोसिएशनने तीन क्लब, 24 खेळाडू आणि तीन क्लब अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे. मिझोरम प्रीमियर लीगमधील सामन्यांचे निकाल फिक्स करण्यात गुंतल्याप्रकरणी सिहफिर वेंगलून एफसी, एफसी बेथलेहॅम आणि रामहलून अॅथलेटिक एफसी या तीन क्लबांवर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक एजन्सींसह चौकशीनंतर मिझोराम फुटबॉल असोसिएशनच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडेच संपलेल्या एमपीएल-11 मधील काही क्लब, अधिकारी आणि खेळाडू भ्रष्ट कृत्यांत गुंतलेले आहेत. यासाठी त्यांना भरपूर विचारविनिमय केल्यानंतर दंड ठोठावण्यात आला आहे, असे राज्य फुटबॉल संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
संघटनेने दोन खेळाडूंवर आजीवन बंदी, चार खेळाडूंवर पाच वर्षांची बंदी, 10 फुटबॉलपटूंवर तीन वर्षांची बंदी आणि कथित भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अन्य आठ जणांवर एक वर्षाची बंदी घातली आहे. ही कृत्ये आमच्या मूल्यांचे गंभीर उल्लंघन करतात, आमच्या खेळाच्या अखंडतेला खीळ घालतात आणि मिझोरम फुटबॉलला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचा अनादर करतात. याचा परिणाम म्हणून आम्ही या प्रकारात गुंतलेल्यांना कठोर दंड ठोठावला आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
आम्ही राज्य फुटबॉलशी संबंधित घटकांना आश्वासन देतो की, या प्रकारात सहभाग असल्याचे आढळलेल्या क्लबना त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील सहभागावर परिणाम करणाऱ्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल आणि यात गुंतलेले खेळाडू आणि अधिकारी ‘एमएफए’द्वारे निलंबन व इतर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. कारवाई झालेले तीन क्लब हे अव्वल राज्य लीगचे भाग आहेत आणि सिहफिरनेही अव्वल चारमध्ये स्थान मिळवलेले आहे. उपांत्य फेरीत त्यांना विजेत्या आयझॉल एफसीकडून पराभूत व्हावे लागले होते.