माता भिमाबाई आंबेडकर स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा :
माता भिमाबाई आंबेडकर स्मारकाच्या कामावर सामाजिक न्याय विभागाचे या पुढे नियंत्रण राहिल व स्मारकाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी आणण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
माता भिमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या अपूर्ण कामाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षम समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह माता भिमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असून गेल्या अनेक वर्षा पासून हे स्मारक रखडले आहे . ते तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या स्मारकचे बांधकामचे थोडे फार काम झाले आहे. हे काम जुने असून याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल. ज्या जागेवर माता भिमाबाई आंबेडकर अंत्यविधी झाला आहे त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल. माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषयक गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे ते तातडीने स्मारक उभारणीसाठी स्थानिक समितीने शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करुन आभार मानले.