भेसळयुक्त तूप पुरवठा करणारे सूत्रधार गजाआड
बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांची कारवाई
बेंगळूर : दोन आठवड्यापूर्वी बेंगळूरमध्ये एका गोदामावर छापा टाकून कोट्यावधी रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप व इतर सामग्री जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांना यश आले आहे. तामिळनाडूमध्ये रसायनमिश्रीत भेसळयुक्त तूप तयार करून नंदिनी ब्रॅण्डच्या नावाने पुरवठा करणाऱ्या दाम्पत्याला गजाआड करण्यात आले आहे. नंदिनी ब्रॅण्डच्या तुपाच्या नावाने भेसळयुक्त तूप पुरवठा करणाऱ्या शिवकुमार व त्याची पत्नी रम्या या दोघांना अटक करण्यात आली आहे. तपासावेळी सीसीबी पोलिसांना हे दाम्पत्य भेसळयुक्त तूप पुरवठा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे आढळून आले.
सीसीबीचे डीसीपी श्रीहरिबाबु यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्याने तामिळनाडूमध्ये तूप तयार करण्याचा कारखाना सुरू केला. तेथे छापा टाकल्यानंतर बनावट तूप तयार करण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री व कच्चा माल आढळून आला. या यंत्रसामग्रीचा वापर करून आरोपींनी नंदिनी ब्रॅण्डच्या नावाने तूप तयार करून त्याचा पुरवठा केला होता. छाप्यावेळी पोलिसांनी सदर यंत्रसामग्री जप्त केली आहे. 14 नोव्हेंबर रोजी बेंगळूरच्या चामराजपेठ येथील गोदामावर छापा टाकून भेसळयुक्त तुपाचे डबे, पाकिटे, बाटल्या, त्यासाठी लागणारे साहित्य, पाम तेल, वाहने जप्त करण्यात आली होती. तसेच 4 जणांना अटक करण्यात आली होती.