भूतानी प्रकल्पाच्या विरोधात सांकवाळमध्ये भव्य निषेध रॅली
वास्को : सांकवाळच्या नियोजित भूतानी इन्फ्रा प्रकल्पाविरूद्ध काल रविवारी संध्याकाळी भव्य निषेध रॅली काढण्यात आली. या निषेध रॅलीत स्थानिक नागरिकांसह गोव्यातील विविध भागातील नागरिक व नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रकल्पाच्या विरोधात सांकवाळच्या श्री शांतादुर्गा संस्थानात गाऱ्हाणे घालून निषेध रॅलीला प्रारंभ करण्यात आला. सांकवाळच्या श्री शांतादुर्गा मंदिराकडून सावरफोंड येथील भूतानी इन्फ्राच्या नियोजित प्रकल्पापर्यंत महामार्गावरून ही रॅली काढण्यात आली. साडे सहाच्या सुमारास सुरू झालेल्या या निषेध रॅलीची रात्री साडेआठच्या सुमारास सांगता झाली.
नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांची प्रकल्पाच्या विरोधात भाषणे झाली. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी सर्वांनी आपल्या भाषणांत केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत जी घोषणा केली आहे, तिचे पालन करत या प्रकल्पाचे सर्व परवाने त्वरित रद्द करावे, अन्यथा प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार आंतोन वास, माजी मंत्री अलिना साल्ढाना, प्रतिमा कुतिन्हो, ओलान्सिया सिमोईस, प्रजल साखरदांडे, स्वप्नेश शेर्लेकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, नारायण नाईक, सांकवाळचे पंच तुळशिदास नाईक व अन्य पंच सदस्य तसेच प्रेमानंद नाईक, दामोदर नाईक, पिटर डिसोजा व इतर समाजसेवक या रॅलीत नागरिकांसह सहभागी झाले होते.