रामा काणकोणकरला अटक करा
तपोभूमीच्या शिष्यांची पणजी पोलिसस्थानकावर धडक : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींबद्दल अनुद्गार काढल्याचा दावा, रात्री उशिरापर्यंत पोलिसस्थानकावर ठिय्या आंदोलन
पणजी : गोवा सरकार व तपोभूमीतर्फे गोवा अध्यात्मिक महोत्सव आयोजित केल्यानंतर या विषयावरून सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी केलेले विधान हे देव-धर्म आणि शास्त्रांचा अपमान करणारे आहे. पद्मश्री विभूषित पुरस्कारप्राप्त स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कार्य सुरू आहे. तरीही रामा काणकोणकर हे चुकीचे विधान करीत आहे. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करा, अशी जोरदार मागणी तपोभूमीच्या भाविकांनी पणजी पोलिसांकडे केली आहे. काल बुधवारी रात्री आठ वाजता तपोभूमी पीठाधीश्वर ब्रम्हेशानंदाचार्य स्वामींच्या अनुयायींनी पणजी पोलिस ठाण्यावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत रामा काणकोणकर याला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. सुमारे दोनशे भाविकांनी पणजी पोलिस ठाण्यावर धाव घेतली होती. रामा काणकोणकर यांनी गोवा अध्यात्मिक महोत्सवाविऊद्ध केलेले विधान हे पूर्णपणे भ्रष्ट झालेल्या व्यक्तीने केलेले आहे, असे आम्ही मानतो. रामा काणकोणकर याने विधीकार्यावर बोलू नये. कारण त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचे श्याम परब यांनी पत्रकारांना सांगितले. रामा काणकोणकर याने राजकारण करताना कोणत्याही हिंदू धर्मियांच्या देव-देवतांना राजकीय अजेंडा बनवू नये. जर असे प्रकार घडत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असे रश्मी नाईक यांनी सांगितले.
तक्रार, निवेदन सादर
पणजी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले. रामा काणकोणकर याच्या विरोधात श्याम परब यांनी रितसर तक्रार नोंद केली आहे. निवेदनावर श्याम परब, रघुवीर शिरोडकर, रश्मी नाईक, प्रियंका व्ही. नाईक, इशा नाईक भामईकर, उपेंद्र नागवेकर, अॅङ दीपा भंडारी, नम्रता पऊळेकर, संपदा नाईक, पृथ्वीराज परब, प्रवीणा नार्वेकर आदींच्या सह्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत पोलिस रामाच्या शोधात
रात्री साडेदहापर्यंत तपोभूमीच्या अनुयायांनी पोलिस ठाण्यावर ठिय्या केल्याने शेवटी रात्री उशिरा रामा काणकोणकर याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत रामा काणकोणकर पोलिसांच्या हाती लागला नव्हता.