रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक हनुमान चालिसाचे पठण
विहिंपतर्फे आयोजन, हजारो भक्तांचा सहभाग
प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्येमध्ये श्री रामलल्ला प्रतिष्ठापना निमित्ताने बेळगावमध्ये हजारो नागरिकांनी एकत्रित येऊन एका सुरात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आयोजित सरदार्स मैदान व व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा कार्यक्रम झाला. रामभक्तांनी एकत्रित येऊन अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जागृती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बेळगावच्या नागरिकांनी या सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला.
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मागील महिनाभरापासून राम मंदिराच्या जागृतीसाठी कार्यक्रम केले जात आहेत. अयोध्या येथील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता तसेच निमंत्रणपत्रिकेचे गावोगावी वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील साडेचार लाख नागरिकांपर्यंत अक्षता पोहोचविण्यात आल्या. याबरोबरच जागृती होण्यासाठी शनिवार दि. 13 रोजी सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्रोच्चार करून 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण
शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता सरदार्स मैदान व व्हॅक्सिन डेपो मैदानावर हनुमान चालिसा पठणाला सुरुवात झाली. प्रारंभी मंत्रोच्चार करून 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. मैदानावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अंदाजे दहा हजार रामभक्तांनी प्रभू रामचंद्रांचरणी 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, विहिंपचे प्रचारक कृष्णा भट, जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा कार्यवाह आनंद करलिंगन्नावर, हनुमान चालिसा परिवाराचे मुनीस्वामी भंडारी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. व्हॅक्सिन डेपो मैदानावर हनुमान चालिसा परिवाराचे अध्यक्षा जेठाभाई पटेल तसेच जिल्हा कोषाध्यक्ष उमेश चिंडक, कार्यवाह बिपिनचंद्र पटेल, संतोष वाधवा, रामकिसन भट्टड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे वितरण
दोन्ही ठिकाणी श्रीरामाच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. भव्य स्क्रीनमुळे या प्रतिमांना अधिक झळाळी आली होती. अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे वितरण सर्वांना करण्यात आले. सामूहिक पठण व अक्षता रोपणानंतर सर्वांना प्रसाद वितरण करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अत्यंत शिस्तबद्धरीत्या हे कार्यक्रम पार पडले.