मसूदकडे कर्णधारपद राहण्याची शक्यता
वृत्तसंस्था / कराची
इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात पाकच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी पाक कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार शान मसुद आपले कर्णधारपद राखेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इंग्लंड आणि पाक यांच्यातील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरपासून मुल्तान येथे खेळविली जाणार आहे. येत्या रविवारी होणाऱ्या चॅम्पियन चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर पीसीबीचे निवड सदस्य इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. पाक संघाला ऑस्ट्रेलियाचे जेसन गिलेस्पी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पीसीबीचे निवड सदस्य प्रमुख प्रशिक्षक गिलेस्पी यांच्याशी चर्चा करुनच पाक संघाची निवड करेल. इंग्लंडचा संघ यापूर्वी म्हणजे 2022-23 च्या क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये बाबर अझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने इंग्लंडचा 3-0 असा व्हाईटवॉश केला होता.
अलिकडेच पाक संघाला त्यांच्या भूमीवर बांगलादेश संघाकडून हार पत्करावी लागल्याने इंग्लंड बरोबरच्या कसोटी मालिकेसाठी पाक संघात बरेच बदल अपेक्षित आहेत. बांगलादेश संघाने पाकचा या मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव केला होता. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी पाक संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बराच बदल होण्याची शक्यता आहे. शान मसुद, बाबर अझम, सौद शकीब, अब्दुल्ला शकीब, सलमान आगा, मोहम्मद रिझवान, कमरान गुलाम, मोहम्मद हुरेरा अशी फलंदाजीची क्रमवारी राहिल, असा तर्क व्यक्त केला जात आहे. पाक संघाने यापूर्वी माय देशात 2022 पूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिका गमविल्या आहेत. पण 2022 नंतर त्यांनी न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले.