60 वर्षांवरील नागरिकांना मास्कची सक्ती
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची माहिती : लवकरच मार्गसूची
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्यानंतर केंद्रीय आरोग्य खात्याने राज्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारनेही खबरदारीची पावले उचलली आहेत. 60 वर्षांवरील नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
सोमवारी कोडगू जिल्ह्यातील कुशालनगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 60 वर्षांवरील नागरिकांना आजपासून (सोमवार) मास्कची सक्ती करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य खात्यामार्फत लवकरच मार्गसूची जारी केली जाईल. कोरोनाच्या नवा व्हेरियंट आढळला आहे. कोणीही याविषयी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा खबरदारी म्हणून 60 वर्षांवरील नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांपैकी काही जण हृदयविकार, मूत्रपिंडदोष व इतर आजारांनी ग्रस्त असतात. त्यामुळे त्यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. कोणकोणत्या खबरदारी उपाययोजना कराव्यात यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ सीमेला लागून असणाऱ्या राज्यातील कोडगू, मंगळूर, चामराजनगर जिल्ह्यांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. केरळमधून राज्यात येणाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, असेही दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.