धर्मस्थळ प्रकरणातील मास्क मॅनला सशर्त जामीन
बेंगळूर : धर्मस्थळमध्ये शेकडो मृतदेह पुरल्यासंबंधी मास्क मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिन्नय्या याने तक्रार दिल्यानंतर खळबळ माजली होती. खोटी जबानी व साक्ष दिल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. आता मंगळूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रुपयांचा बॉण्डसह विविध 12 अटींवर त्याला जामीन देण्यात आला आहे. धर्मस्थळ प्रकरणासंबंधी एसआयटीने मागील आठवड्यात चिन्नय्यासह सहा आरोपींविरुद्ध बेळतंगडी न्यायालयात अहवाल सादर केला होता. दरम्यान, चिन्नय्याला जामीन मंजूर झाला आहे. एसआयटीचे अधिकारी धमकावून जबाब नोंदवत आहेत. कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तपास केला जात असल्याचा ठपका चिन्नय्या याने एसआयटीवर ठेवला होता.
प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याने मंगळूर जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. सोमवारी सुनावणीवेळी न्यायालयाने त्याला 12 अटीवर जामीन मंजूर केला आहे. कोणत्याही गुन्ह्याचा प्रयत्न करू नये, चौकशीपासून दूर राहण्यासाठी पळ काढणे, अज्ञात स्थळी जाऊ नये, साक्षीदारांवर कोणताही प्रभाव पाडू नये, खटल्याशी संबंधित पुरावे किंवा कागदपत्रे नष्ट करू नये, तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यानंतर त्वरित हजर राहावे, सुनावणीसाठी न्यायालयात न चुकता हजर राहावे, पत्ता बदला असेल तर न्यायालयाला कळवावे, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअॅप, ई-मेलची माहिती द्यावी, खटल्यासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नयेत, जामिनावर मुक्तता झाल्यानंतर दिवसाआड न्यायालयात हजेरी नोंदवावी, अशी अटी घालण्यात आल्या आहेत.