हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर पाण्याखाली
देवाचीहट्टी पुलावर पाणी, कणकुंबी भागात मुसळधार
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आलेला असून हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच देवाचीहट्टी, हब्बनहट्टी दरम्यान असलेल्या मलप्रभा नदीवरील पुलावर पाणी आल्याने काही काळासाठी वाहतूक बंद झाली होती. तसेच तोराळी येथील ब्रिजकम बंधाऱ्यांच्या पुलालाही लागून पाणी गेले. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच एवढा पूर आला आहे.
कणकुंबी भागात विजेचा लपंडाव
जांबोटी, कणकुंबी भागात पावसाने हैदोस घातला असून या भागातील सर्व नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्याचबरोबर गेले आठ दिवस कणकुंबी भागात विजेचा लपंडाव असून या भागातील काही गावे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात आहेत. त्यामुळे कणकुंबी भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सर्व धबधबे प्रवाहित
सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील सर्व धबधबे प्रवाहित झालेले असून वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला आहे. मे महिन्यात 531.8 तर जून महिन्यात अद्याप 1100 मि. मी. असा एकूण 1640 मि. मी. पाऊस कणकुंबी भागात झाला आहे. बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावरील वाहतूक बैलूर व खानापूरमार्गे वळवली विशेषत: बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यापैकी कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर व खानापूरमार्गे वळविण्यात आली आहे.