मारुती सुझुकीचे उत्पन्न 43 हजार कोटी पार
सप्टेंबर तिमाहीचा निकाल घोषित : 5.50 लाख कारची विक्री
वृत्तसंस्था/ नोएडा
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 43 हजार 290 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. हे उत्पन्न मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 11 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये पाहता कंपनीने 38972 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 5.50 लाख कार्सची विक्री केली आहे. एकूण उत्पन्नामधून वेतन, कर, कच्च्या मालाचा खर्च यासारखे खर्च कमी केल्यास कंपनीकडे शुद्ध नफारुपात 3349 कोटी रुपये शिल्लक राहतात. सदरचा एकत्रित निव्वळ नफा हा मागच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 8 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 3102 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता.
एवढा मिळवला महसूल
याच दरम्यान सदरच्या तिमाहीत कंपनीने 13 टक्के वाढीसोबत 42,344 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी 37,449 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. दुसऱ्या तिमाहीत पाहता 5 लाख 50 हजार 874 गाड्यांची विक्री कंपनीने केली आहे. देशात मात्र कार विक्री 5 टक्के कमी राहिली. दुसरीकडे निर्यातीमध्ये मात्र चांगली कामगिरी करताना 42 टक्के वाढ कंपनीने नोंदवली आहे.
समभागाचा परतावा
कंपनीच्या समभागाने 6 महिन्यात 32 टक्के परतावा दिला असून वर्षभरात 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत समभाग 45 टक्के तेजीत आहे.