हुतात्मा जवान दयानंद तिरकण्णावर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सांबरा येथे मराठा लाईट इन्फंट्रीने दिली मानवंदना
वार्ताहर/ सांबरा
‘अमर रहे अमर रहे हुतात्मा जवान अमर रहे’ अशा घोषणा देत गुऊवारी हुतात्मा जवान सुभेदार दयानंद तिरकण्णावर यांच्यावर सांबरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये झालेल्या वाहन अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये मूळचा सांबरा येथील व सध्या राहणार पंतनगर येथील जवान सुभेदार दयानंद कलाप्पा तिरकण्णावर यांनाही वीरमरण प्राप्त झाले. 11 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते गेल्या 27 वर्षांपासून सेवा बजावत होते. दोन वर्षांनंतर सेवानिवृत्त होणार होते. मात्र वाहन अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी रात्री जम्मू-काश्मीर येथून त्यांचे पार्थिव सांबरा विमानतळावर आणल्यानंतर बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेंटरमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले.
गुऊवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, समाज कल्याण खात्याचे मंत्री एच. सी. महादेवाप्पा, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रांताधिकारी आदींनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कणबर्गी, कलखांब, मुचंडी, अष्टे, खणगाव, सुळेभावीमार्गे पंतनगर येथील त्यांच्या घरामध्ये काहीवेळ पार्थिव ठेवण्यात आले होते.
ठिकठिकाणी श्रद्धांजली
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बाळेकुंद्रीमार्गे सांबरा येथे आल्यानंतर गावातील मराठी प्राथमिक शाळेमध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. दुपारी दीड वाजता फुलांनी सजवलेल्या वाहनातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळकरी मुले, माजी सैनिक, विविध संघ-संस्थांचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी तीन वाजता मिरवणूक लिंगायत स्मशानभूमी येथे आल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार असोदे, मराठा इन्फंट्रीतील अधिकारी आदी उपस्थित होते. तिरकण्णावर यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
दु:ख अनावर
सुभेदार दयानंद तिरकण्णावर हुतात्मा झाल्याचे समजताच लोकांना दु:ख अनावर झाले. गावातील जवान हुतात्मा होण्याची ही पहिलीच घटना असल्याने मेन रोडवर व गावामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता.