पृथ्वीवरील या ठिकाणी मंगळ ग्रहासारखी स्थिती
एका ठिकाणी 10 लाख वर्षांपासून पडला नाही पाऊस
पृथ्वीवर अनेक थक्क करणारी ठिकाणं आहेत. तर पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत, ज्यावरील स्थिती मंगळ ग्रहाप्रमाणे आहे. उत्तर आइसलँड देखील एक असेच ठिकाण असून तेथे गेल्यावर तुम्ही पृथ्वीऐवजी मंगळ ग्रहावर पोहोचल्याचे वाटू शकते.
चिलीचे अटाकामा मरुस्थळ
अटाकामा वाळवंटानजीक चिलीचे युनगे ठिकाण असून येथे एकेकाळी तांब्याच्या अनेक खाणी होत्या, ज्या आता बंद पडल्या आहेत. हे ठिकाण चिलीच्या एंटोफागस्टा शहराच्या दक्षिणेला आहे. याला जगातील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एका मानले जाते. अनेक दशकांपर्यंत येथे पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. येथे वर्षभरात सरासरी 10 मिलिमीटर पाऊस पडतो. यामुळे येथील माती अत्यंत कोरडी आहे. अटाकामा वाळवंट हे मंगळ ग्रहावरील पृष्ठभागाप्रमाणे दिसून येते. मंगळ ग्रहही अत्यंत थंड, कोरडा आणि खडकाळ वाळवंटी ग्रह आहे. अटाकामा येथील मातीचा रंग मंगळ ग्रहासारखाच आहे. याचमुळे नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावर पाठविल्या जाणाऱ्या रोवर्सचे परीक्षण येथेच केले होते. नासाने येथील मातीच्या खननानंतर विचित्र बॅक्टेरियांचा शोध लावला होता. यानंतर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखालीही काही जीव असू शकतात असी अपेक्षा बळावली होती.
हँक्सविल, यूटा, अमेरिका
दक्षिण पश्चिम अमेरिकेच्या कोलोराडोच्या पठारी भागात नारिंगी रंगाचा खडकाळ भाग मंगळ ग्रहाशी मिळताजुळता आहे. येथील काही खडक हे ज्युरासिक काळातील आहेत. अमेरिकेच्या यूटा प्रांतातील हँक्सविल भाग अंतराळाशी निगडित प्रयोगांसाठी उपयुक्त ठरला आहे. अलिकडेच कॅनडा आणि ब्रिटनच्या अंतराळ वैज्ञानिकांनी येथे मंगळ ग्रहावर पाठविल्या जाणाऱ्या रोव्हरचे परीक्षण केले आहे.
अंटार्क्टिकात केवळ बर्फाळ पर्वत नाहीत. तेथील मॅक्मर्डो ड्राय व्हॅली ही बर्फापासून मुक्त भाग आहे. येथील तापमान उणे 15 अंशापासून उणे 30 अंशापर्यंत राहते. येथे 10 लाख वर्षांपासून पाऊस पडला नसल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. काही ठिकाणी हिमवृष्टी मात्र होत असते. पाऊस पडत नसल्याने आणि थंडी अधिक असल्याने पडणारा बर्फ येथे त्वरित गॅसचे स्वरुप घेत असतो. अशाच प्रकारची स्थिती मंगळ ग्रहावरही आहे. अंटार्क्टिकाच्या मॅक्मर्डो ड्राय व्हॅली वादळी वाऱ्यांचे आक्रमण झेलते. याचा सरासरी वेग 320 किलोमीटर प्रतितासापर्यंत असतो. मंगळ ग्रहावरही जोरदार वारे वाहत असतात.
कॅनेरी आयलँड्स, तेनरीफ
स्पेन या देशातील प्रसिद्ध कॅनेरी आयलँड्सची निर्मिती तीस लाख वर्षांपूर्वी एका ज्वालामुखी विस्फोटामुळे झाली होती. हे सध्या जगातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे मंगळ ग्रहासारखे वातावरण येथे पाहू शकता. या बेटाच्या मधोमध ज्वालामुखी असून याची उंची 3718 मीटर आहे. ज्वालामुखीच्या आसपास लाव्हारसाने निर्मित अनेक गुहा आहेत. अशा गुहा मंगळ ग्रहावरही असतील, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. मंगळ ग्रहावरील अशाप्रकारच्या गुहांमध्ये पाणी असण्याची दाट शक्यता असल्याचे मानले जाते.
पिलबारा, ऑस्ट्रेलिया
हे खडकाळ वाळवंट मध्य आणि पश्चिम ऑस्ट्रेलियात फैलावलेले आहे. येथील लाल खडकांदरम्यान वाळूचे ढिग दिसून येतात. बऱ्याच अंशी हा भाग मंगळ ग्रहासारखा दिसतो. येथे वाहणारे जोरदार वारे आणि छोट्या नद्या मंगळ ग्रहासारख्या वातावरणाची अनुभूती करण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. पिलबारामध्ये जगातील सर्वात जुने खडक आहेत. येथे 3.4 अब्ज वर्षांपूर्वी जन्मलेल्या काही जीवांच्या खुणाही मिळाल्या आहेत.
स्वालबार्ड, नॉर्वे
आर्क्टिकच्या नजीक असलेला हा पठारी भाग लाल वाळू आणि दगडांनी भरलेला आहे. येथील माती पाहून तुम्हाला लाल ग्रहाचीच आठवण होईल. आर्क्टिकच्या नजीक असल्याने स्वालबार्ड अत्यंत थंड असते. अनेक देशांचे अंतराळ वैज्ञानिक येथे प्रयोग करण्यासाठी येत असतात.