गावकऱ्याशी लग्न करा, 3 लाख मिळवा
खरे तर कोणी कोणाशी विवाह करावा, हा खासगी विषय आहे. पूर्वीच्या काळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तरुण-तरुणींचे विवाह जुळवत असत आणि ते बिनबोभाटपणे होतही असत. पण आता विवाह ही ज्याच्या त्याच्या पसंतीची बाब असल्याचे मानले जाऊ लागले आहे. पण यामुळे काही समस्याही निर्माण होत आहेत. खेड्यातले तरुण, शेती करणारे तरुण, सैन्यातले तरुण इत्यादींचे विवाह होणे कठीण झाले आहे. कारण तरुणी सहसा शहरी, उत्पन्नाचे निश्चित साधन असणारा आणि सुरक्षित नोकरी किंवा व्यवसाय असणारा पती पसंत करतात. अगदी खेड्यातल्या तरुणींनाही असाच नवरा हवा असतो, असे दिसून येते.
अत्युच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेला, पण आपल्या पारंपरिक संस्कृतीचेही तितक्याच कसोशीने जतन करणाऱ्या जपान या देशालाही आज या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे. या देशाचे दुसऱ्या महायुद्धानंतर वेगाने शहरीकरण झाले. तसेच या देशाने तंत्रवैज्ञानिक प्रगतीही उत्कृष्ट केली. त्यामुळे शहरांमध्ये संपत्ती वाढली. साहजिकच तरुणी शहरी नवरेच हवेत असा आग्रह धरु लागल्या आणि खेड्यांमधील तरुणांची लग्ने होणे कठीण झाले. म्हणून त्या देशात आता सरकारनेच एक योजना पुढे आणली आहे. या योजनेनुसार खेड्यातील तरुणाशी विवाह करणाऱ्या आणि खेड्यात संसार थाटू इच्छिणाऱ्या तरुणीला 6 लाख येन किंवा 3 लाख 50 हजार रुपये मानधन म्हणून मिळतील. विशेषत: राजधानी टोकिओतील तरुणींसाठी ही योजना आहे. तथापि, जपानमधील विरोधी पक्षांनी या योजनेच्या विरोधात रान उठविल्याने ती मागे घ्यावी लागली. मात्र, चीनमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. चीनमध्ये लोकशाही नसल्याने तेथे या योजनेला विरोध करणारे कोणीही नाही. या योजनेमुळे नागरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक असमतोल दूर होण्यास साहाय्य झाले, असे चीन सरकार म्हणते.