सासरच्या छळाला कंटाळून कलखांब येथील विवाहितेची आत्महत्या
बेळगाव : पती तसेच सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. 28 रोजी रात्री 10 च्या सुमारास कलखांब येथे घडली. याप्रकरणी बुधवार दि. 29 रोजी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून शितल राजू नायक (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सासरच्या पाच जणांविरुद्ध मारिहाळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राजू लकाप्पा नायक, शेवंता लकाप्पा नायक, लकाप्पा नायक, काळेश नायक, दीपू लकाप्पा नायक सर्वजण रा. कलखांब यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शितलचे माहेर संतिबस्तवाड असून चार वर्षांपूर्वी तिचा विवाह कलखांब येथील राजूसोबत झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांतच सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ चालविला होता. याच कारणातून शितलने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूस सासरची मंडळी कारणीभूत असल्याची फिर्याद वडील दुर्गाप्पा अंकलगी यांनी दिली. शितलच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.