For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप नेत्याविरुद्ध विवाहितेची पोलिसात तक्रार

10:25 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप नेत्याविरुद्ध विवाहितेची पोलिसात तक्रार
Advertisement

सासरच्या मंडळींविरुद्ध खोट्या तक्रारीस भाग पाडल्याचा आरोप : चौघांना अटक

Advertisement

बेळगाव : एका विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून भाजप नेत्यासह चौघा जणांविरुद्ध येथील खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 19 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून भाजपचे स्थानिक नेते पृथ्वी सिंग लुधार, त्याचा मुलगा जसवीरसिंग लुधार, दोघेही रा. जयनगर-हिंडलगा, इम्रान जमादार, रा. खंजर गल्ली, नजीर पिरजादे, रा. गोकाक, या चौघा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 309(6), 123, 333, 126(2), 115(2), 127(4), 75(2), 78(2), 352, 351(2), 3(6) व भारतीय शस्त्रास्त्र कायदा 1959 कलम 25 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध छळाची तक्रार केली होती. पृथ्वी सिंगच्या दबावावरून आपण ही तक्रार केल्याचे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या विवाहितेने पृथ्वी सिंग व साथीदारांविरुद्ध गंभीर आरोप केले असून मानसिक व शारीरिक छळासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. इस्पितळातून डिस्चार्ज झाल्यानंतर पृथ्वी सिंग याने आपला मोबाईल काढून घेऊन घरात कोंडून ठेवल्याचा आरोप विवाहितेने केला असून मुलावरही विनयभंगाचा आरोप केला आहे. 20 ऑगस्ट रोजी जयनगर येथील आपल्या घरी नेऊन एक दिवस कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशी 21 ऑगस्ट रोजी आपल्याला गोंधळी गल्लीत सोडून देण्यात आले. दि. 22 ऑगस्ट रोजी रात्री गोंधळी गल्ली येथील आपल्या नातेवाईकांच्या घरात बेकायदा प्रवेश करून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्या विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. आपण विष घेतले नाही, पृथ्वी सिंगनेच आपल्याला विषारी पदार्थ पाजल्याचा गंभीर आरोप या विवाहितेने केला असून महिनाभर कोंडून ठेवलेले असताना मारहाण करीत बंदूक दाखवून धमकावल्याचेही तिने म्हटले आहे. विवाहितेने केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

पोलीस अधिकाऱ्यांशी लागेबांधे

या प्रकरणामुळे पृथ्वी सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा फिर्याद दिलेल्या विवाहितेच्या सासरवासियांनीही पृथ्वी सिंगविरुद्ध कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणातील गुंता वाढत चालला आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजपचा नेता म्हणून वावरणाऱ्या पृथ्वी सिंगचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घनिष्ठ संबंध आहेत. त्याच्या जोरावरच असे उपद्व्याप सुरू असतात. विवाहितेच्या सासरवासियांना धमकावतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली असून खडेबाजार पोलिसांनी या प्रकरणातील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Tags :

.