साठ पुरुषांसमवेत विवाह
जेव्हा कोणीही व्यक्ती त्याच्या विवाहासंबंधी विचार करु लागते, तेव्हा आपला किंवा आपली जोडीदार आपल्या अनुरुप आहे की नाही, हे प्रथम पाहिले जाते, हे आपल्याला माहीत आहे. विवाहबंधन हे जन्मभरासाठी असते, असे भारतात आजही मानले जाते. त्यामुळे आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडताना चोखंदळपणा दाखविला जाणार हे नैसर्गिक आहे. तथापि, आपल्याला अनुरुप आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या एकाहून अधिक व्यक्ती असतील, तर विवाहेच्छु लोक काय करतील ? ते यांपैकी केवळ एकाच जोडीदाराची निवड करु शकतात.
तथापि, ऑस्ट्रेलियात एक युवती अशी आहे, की जिला तिचे जोडीदार म्हणून 60 युवक आवडले. पण तिने त्यांच्यापैकी एकाची निवड न करता या सर्व 60 युवकांशी एकाच वेळी विवाह केला आहे. कार्ली सरे असे या महिलेचे नाव असून सध्या ती 40 वर्षांची आहे. ही महिला व्यवसायाने छायाचित्रकार आहे. तिला लग्नाची सध्याची पद्धती आवडत नाही. तिच्या म्हणण्यानुसार तुम्हाला एकाहून अधिक जोडीदार आवडले असतील तर त्यांच्याशी एकाचवेळी विवाह करण्याचा अधिकार तुम्हाला असला पाहिजे. हा अधिकार पुरुष आणि स्त्री अशा दोघांनाही असावयास हवा. आपली ही संकल्पना तिने साकारली आहे. छायाचित्रकारी करताना तिचा अनेक लोकांशी संपर्क आला. त्यातील जे तिला आवडले, त्या सर्वांना तिने मागणी घातली. ते यासाठी तयारही झाले आणि तिने एकाच वेळी आपल्याला आवडणाऱ्या 60 जणांशी विवाह केला. हा एक विक्रमच आहे.
साठ जणांशी विवाहाचा हा सोहळा तीन दिवस चालला होता. तिने या सर्व जोडीदारांसमवेत प्रेम आणि विश्वासाची शपथही घेतली. तिच्या या जोडीदारांमध्ये केवळ पुरुषच आहेत असे नाही, तर युवती किंवा महिलाही आहेत. विवाह केवळ पुरुष आणि स्त्री यांच्यात व्हावा, हे ही तिला मान्य नाही. जो किंवा जी आपल्याला आवडेल, आणि त्याची किंवा तिची तयारी असेल तर विवाह करण्याचा अधिकार असावा. जोडीदारांच्या संख्येचे बंधन असू नये असे तिचे म्हणणे आहे. आता तिचे हे 61 जणांचे कुटुंब किती दिवस असेच टिकून राहते, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण तिने तिच्या संकल्पनेप्रमाणे विवाह केला आहे, हे खरे.