लग्नाचा प्रस्ताव चावा घेऊन
अनेक समाजांमध्ये काही अत्यंत अद्भूत प्रथा असतात, ही बाब सर्वज्ञात आहे. चीनच्या हैनान प्रांतात एक ‘मियाओ’ नामक आदिवासी जमात आहे. या जमातीतील एक प्रथा असा अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. या जमातील लग्नाचा प्रस्ताव दाताने हाताला चावून दिला जातो. एखाद्या तरुणाला जर त्याच्या आवडीच्या तरुणीला विवाहाचा प्रस्ताव द्यायचा असेल, तर तो तिच्या हाताचा आपल्या दातांनी जोरात चावा घेतो. या चाव्याची खूण जितकी खोल असेल, तितने त्याच्या तिच्यावरचे प्रेम प्रगाढ आहे, असे मानले जाते. या प्रथेला ‘याओ शो डिंग किंग’ असे म्हणतात. ही प्रथा या जमातीत हजारो वर्षांपासून असल्याचे दिसते.
या प्रथेचा पुढचा भाग अधिकच स्वारस्यपूर्ण आहे. जर चावा घेतला गेलेल्या युवतीने तितक्याच जोराने त्या युवकाच्या हाताचा चावा घेतला आणि त्यामुळे रक्तस्राव झाला, तर या युवतीला युवकाचा प्रेमाचा प्रस्ताव मान्य आहे, असे मानले जाते. नंतर त्या दोघांचे समाजातील लोकांच्या साक्षीने थाटामाटात लग्न लावले जाते. जर युवतीला प्रस्ताव मान्य नसेल, ती प्रस्ताव देणाऱ्या युवकाच्या हाताचा हलका चावा घेते. हलका चावा घेतल्यास तिला प्रस्ताव मान्य नाही. हे समजून येते. त्यामुळे या जनजातीतील युवक युवतींच्या हातावर असे अनेक चावेही आढळून येतात. अशा प्रकारे चावा आणि प्रतिचावा यांच्या माध्यमातून प्रेमाची देवाणघेवाण झाली, की मग युवकाच्या आणि युवतीच्या घरचे लोक विवाह पक्का करतात. विवाहाआधी साखरपुडा केला जातो. साखरपुड्याला कोंबडीच्या मांसाचे, म्हणजेच चिकनचे पदार्थ केले जातात. अशा प्रकारे त्या दोघांचा विवाह निश्चित झाला असे मानले जाते. हे सर्व प्रकार झाल्यानंतर मग नंतरच्या एखाद्या मुहूर्तावर दोघांचा विवाह केला जातो. अशी ही प्रथा केवळ जगाच्या याच भागात आढळते.