For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटमध्ये लग्नसराई

06:15 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेटमध्ये लग्नसराई
Advertisement

 वर्षभरात टीम इंडियाच्या सात खेळाडूंचे सातफेरे : ऑस्ट्रेलियाचा ख्रिस ग्रीन, आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झीही अडकला विवाहबंधनात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपून आता महिना उलटला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारत-द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान, इंग्लंड-विंडीज यांच्यात द्विपक्षीय मालिका सुरु आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे क्रिकेटचा थरार तर दुसरीकडे क्रिकेटमध्ये लग्नसराई सुरु असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षभरात टीम इंडियाचे सात खेळाडू बोहल्यावर चढले आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा ख्रिस ग्रीन, आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी यांनी देखील लग्नगाठ बांधली आहे. यंदाच्या वर्षभरात बोहल्यावर चढलेल्या या क्रिकेटपटूंचा घेतलेला थोडक्यात आढावा.

Advertisement

  1. केएल राहुल व अतिया शेट्टी - टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने यंदाच्या वर्षी 23 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेत्री अतिया शेट्टीशी लग्न केले. अतिया ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी असून या सोहळ्यासाठी अनेक नामांकित क्रिकेटपटूंसह बॉलिवूड अभिनेते उपस्थित होते.
  2. अक्षर पटेल व मेहा पटेल - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने यंदाच्या वर्षात 27 जानेवारी रोजी आपली गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्न केले. अनेक महिने डेट केल्यानंतर अक्षरने यंदाच्या वर्षी लग्नाची गाठ बांधली.
  3. शार्दुल ठाकूर व मिताली पारुलकर - यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमधील 27 रोजी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने आपला नंबर नोंदवताना मैत्रीण मिताली पारुलकरसोबत लग्न केले. 2021 मध्ये शार्दुल आणि मितालीचा साखरपुडा झाला होता.
  4. ऋतुराज गायकवाड व उत्कर्षा पवार - या वर्षी दमदार फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड देखील बोहल्यावर चढला. 3 जून रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. उत्कर्षा ही देखील एक क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते.
  5. प्रसिद्ध कृष्णा व रचना - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 8 जून रोजी रचनासोबत लग्न केले. दुखापतीमुळे संघाबाहेर असताना कृष्णाने लग्नगाठ बांधली. बेंगळूरची रहिवासी असणारी रचना ही एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर आहे.
  6. मुकेश कुमार - वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने मैत्रीण दिव्याशी मागील महिन्यात 28 नोव्हेंबर रोजी लग्न केले. मुकेश व दिव्या हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. दिव्या ही सर्वसामान्य कुटुंबातून येते.
  7. नवदीप सैनी - वेगवान गोलंदाज नवदीप सैनी देखील गत महिन्यात विवाहबंधनात अडकला. सैनीने गुपचूप लग्न करत सर्वांनाच सरप्राईज दिले. नवदीपने मैत्रीण स्वाती अस्थानासोबत सातफेरे घेतले. स्वाती एक फॅशन डिझायनर आहे.
  8. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ख्रिस ग्रीन - ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू ख्रिस ग्रीनही मागील महिन्यात विवाहबंधनात अडकला. ग्रीनने आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  9. आफ्रिकन क्रिकेटपटू कोएत्झी - द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीनेही नव्या आयुष्याची सुरुवात करताना मैत्रीण हानाशी लग्न केले. या दोघांनीही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेली काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनाही विवाहाचा निर्णय घेतला.
Advertisement

.