30 हजार फुटांच्या उंचीवर विवाह
विवाह हा कुठल्याही जोडप्यासाठी अत्यंत खास क्षण असतो, अशा स्थितीत ते या क्षणाला स्मरणीय करण्याची इच्छा बाळगून असतात. याचमुळे लोक विवाह अनोख्या ठिकाणी व्हावा, असा विचार करत असतात. अनेक लोक डेस्टिनेशन वेडिंग करतात. कुणी पर्वतीय भागांमध्ये तर कुणी प्रसिद्ध वास्तूंमध्ये विवाह करू इच्छितो, परंतु एका जोडप्याने 30 हजार फुटांच्या उंचीवरच विवाह केला आहे. त्यांनी एका विमानात विवाह केला आणि त्यांच्या या खास क्षणाचे साक्षीदार विमानातील सर्व प्रवासी ठरले, जे अतिथीही झाले. या विवाहानंतर विमानातच जल्लोष करण्यात आला.
आइसलँड येथे राहणारा एलेक्सँडर वॅलूर आणि फ्रान्समध्ये राहणारी कीटा यांनी प्ले एअरलाइन्समध्ये विवाह केला आहे. कंपनीने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकौंटवर दोघांच्या विवाहाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. हे जोडपं आइसलँड येथून फ्रान्सला जात होते. दोघेही 2 वर्षांपासून एकत्र असून यादरम्यान त्यांनी मोठा प्रवास केला आहे.
विमानातही विवाह करता येतो हे कळल्यावर ही संधी हातून घालवायची नाही असा विचार केला. विवाहासाठी एका पाद्रीलाही बोलाविले. विमानात सुमारे 200 प्रवासी होते, त्यांना विवाहानंतर शॅम्पेन सर्व करण्यात आली आणि तसेच मिठाईही खायला दिली. विवाह अत्यंत चांगल्याप्रकारे पार पाडला. आता मी पत्नीसोबत पॅरिस फिरण्यासाठी जात असल्याचे एलेक्सँडरने सांगितले आहे.
प्रवासादरम्यान झाली भेट
जोडप्याची भेट देखील प्रवास करतानाच झाली होती. कीटा कामानिमित्त आइसलँडच्या प्रवासावर होती, तेव्हा तिची भेट एलेक्सँडरशी झाली, जो टूर गाइड होता. दोघेही त्या ट्रिपवर भेटले आणि कनेक्टेड राहिले, जेव्हा दुसऱ्यांदा कीटा आइसलँडमध्ये पोहोचली तेव्हा एलेक्सँडरने तिला डेटसाटी विचारले. दोघांनाही परस्परांची साथ आवडली आणि लवकरच ते प्रेमात पडले. तेव्हापासून ते एकत्र आहेत.