मारक्रेम, मॅथ्युजला आयसीसी पुरस्कार
वृत्तसंस्था / दुबई
द. आफ्रिकेचा फलंदाज अॅडन मारक्रेम तसेच विंडीजची कर्णधार हिली मॅथ्युज यांची जून महिन्यासाठी आयसीसीने अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून निवडले आहेत.
लॉर्डस्वर झालेल्या आयसीसीच्या विश्वकसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 30 वर्षीय मारक्रेमने 136 धावांची विजयी खेळी करत द. आफ्रिकेला विजेतेपद मिळवून दिले होते. मारक्रेमच्या या कामगिरीची दखल घेत आयसीसीने त्याची जून महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड केली.
महिलांच्या विभागात विंडीजची कर्णधार हिली मॅथ्युजची जून महिन्यासाठी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने घोषणा केली आहे. मॅथ्युजने आयसीसीचा हा मासिक पुरस्कार आतापर्यंत चारवेळा पटकाविला आहे. महिलांच्या विभागात या जेतेपदाच्या शर्यतीमध्ये मॅथ्युजने ब्रिट्स, फ्लेचर यांना मागे टाकले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अॅस्ले गार्डनरने आयसीसीचा हा मासिक पुरस्कार चारवेळा मिळविला होता. आता मॅथ्युजने गार्डनरचा विक्रमाशी बरोबरी साधली आहे. द. आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील झालेल्या टी-20 मालिका विंडीजने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. या मालिकेत हिली मॅथ्युजची कामगिरी दर्जेदार झाली होती.