चार दिवसांच्या घसरणीला विराम, बाजारात तेजी
सेन्सेक्स 317 अंकांनी तेजीत, सर्व क्षेत्रांचे निर्देशांक नफ्यात
मुंबई :
मंगळवारी भारतीय शेअर बाजार सलगच्या चार दिवसांच्या घसरणीनंतर तेजी दाखवत बंद झाला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांनी चमकदार कामगिरी केली तर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले होते. महागाई कमी झाल्याचे दिलासादायी आकडेही बाजाराला आधार देऊ शकले.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 317 अंकांनी वाढत 82570 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी निर्देशांक 113 अंकांच्या तेजीसोबत 25195 अंकांवर बंद झाला. मिडकॅप-स्मॉलकॅप समभागांनी तेजी अनुभवली तर ऑटो, रियल्टी, एफएमसीजी, पीएसयु बँकेच्या समभागांमध्येही खरेदीचा माहोल होता. बँक निफ्टी निर्देशांकही 241 अंकांच्या वाढीसोबत 57007 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टी ऑटो निर्देशांक 353 अंकांनी तेजीसह 23905 च्या स्तरावर, एफएमसीजी 403 अंकांनी वाढत 56429 अंकांवर, फार्मा 255 अंकांच्या तेजीसह 22665 व आयटी निर्देशांकही 150 अंकांनी वाढत 37424 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी स्मॉलकॅप-100 180 अंकांच्या तेजीसह 19135 वर तर निफ्टी मिडकॅप-50 निर्देशांक 163 अंकांनी तेजीसह 16783 च्या स्तरावर बंद झाला.
बाजाराला तेजी मिळवून देण्यात हिरो मोटोकॉर्प (4.95 टक्के), बजाज ऑटो (2.76 टक्के), सनफार्मा (2.68 टक्के), श्रीराम फायनान्स (2.19 टक्के), अपोलो हॉस्पिटल (1.80 टक्के) आणि बजाज फिनसर्व्ह (1.77 टक्के) यांनी मोठा हातभार लावला होता. दुसरीकडे एचसीएल टेक (3.26 टक्के), एसबीआय लाइफ (1.50 टक्के), इटर्नल (1.3 टक्के), एचडीएफसी लाइफ(0.90 टक्के), कोटक महिंद्रा (0.71 टक्के) व टाटा स्टील (1.14 टक्के) हे निफ्टीतले समभाग मात्र घसरणीसह बंद झालेले दिसले.
जागतिक बाजारात पाहता अमेरिकेत व आशियाई बाजारात तेजीचा सूर होता. युरोपातील बाजारात पाहता काहीसा मिश्र कल होता. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 31 अंक, एस अँड पी-500 8 अंक व नॅसडॅक 54 अंकांनी तेजीत होता. आशियाई बाजारात निक्केई 218 अंक, हँगसेंग 386 अंक व कोस्पी 13 अंकांनी तेजीत होता. शांघाय कम्पोझीट मात्र अल्पश घसरणीसोबत व्यवहार करत होता.