9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2.29 लाख कोटींनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दहा कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल मूल्य शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये 2,29,589.86 कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले आहे. यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले.
मागच्या आठवड्यात बीएसइ सेन्सेक्स निर्देशांक 685 अंकांनी वाढला होता. यासोबतच एनएसई निफ्टी निर्देशांक 223 अंकांनी वधारला होता. बाजार भांडवल मूल्याचा विचार करता एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 60,656 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 23 हजार 202 कोटी रुपयांवर पोहचले. यासोबतच एचडीएफसी बँकेचे बाजारभांडवल मूल्य 39 हजार 513 कोटी रुपयांनी वाढत 13 लाख 73 हजार 932 कोटी रुपयांवर पोहचले.
स्टेट बँकेचे बाजारमूल्य 20482 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 48 हजार 775 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 15858 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 17 हजार 724 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. यासोबतच हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 11 हजार 947 कोटींनी वाढत 5 लाख 86 हजार 516 कोटी रुपयांवर तर आयटी कंपनी टीसीएसचे मूल्य 10 हजार 58 कोटींनी वाढत 15 लाख 46 हजार 207 कोटी रुपयांवर पोहचले. दुसरीकडे आयटी कंपनी इन्फोसिसचे मूल्य घसरणीत होते.