अकासा नवी विमाने ताफ्यात समाविष्ट करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअर यांनी पुढील वर्षी मार्चपर्यंत आपल्या ताफ्यात आणखी नवी विमाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता कंपनी बोईंग यांच्याशी चर्चा करते आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये सुरु झालेल्या अकासाच्या या विमान सेवेत सध्याला 26 बोईंग 737 मॅक्स विमाने आहेत. तर कंपनीने 200 विमानांची ऑर्डर देऊन ठेवलेली आहे. कंपनीचे मुख्य विनय दुबे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या कंपनीला 2024 हे वर्ष खूप चांगले गेले आहे आणि 2025 मध्ये पाय आणखी मजबूत रोवण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. विमानातून प्रवास केलेल्यांचा प्रतिसादही चांगला लाभला असून सेवेबाबतही ते समाधानी आहेत. या बळावर कंपनीने 2025 मध्ये ताफ्यात आणखी विमानांची भर घालण्याचे ठरवले आहे.
विमानांच्या संख्येचे स्पष्टीकरण नाही
यावर्षी कंपनीने आपल्या ताफ्यात 4 विमाने समाविष्ट केली आहेत. विमानांचा पुरवठा करण्याबाबत कोणताही विलंब होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुढील वर्षी किती नव्याने विमानांचा समावेश करणार आहे याचा खुलासा त्यांनी केला नाही. जानेवारीत कंपनीने 150 बोईंग विमानांची ऑर्डर नोंदवली आहे. 2021 मध्ये कंपनीने 72 बोईंग विमानांची ऑर्डर दिली होती.