दहापैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य 1.55 लाख कोटींनी वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरील 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 55 हजार 703 कोटी रुपयांनी वाढलेले पहायला मिळाले. एचडीएफसी बँक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन कंपन्या बाजार मूल्य वाढविण्यामध्ये अग्रेसर राहिल्या होत्या.
मागच्या आठवड्यात 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1536 अंकांनी म्हणजेच 1.98 टक्के आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 374 अंकांनी म्हणजेच 1.59 टक्के वाढत बंद झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने 1961 अंकांची झेप घेत 79117 अंकांपर्यंत मजल मारली होती. निफ्टीदेखील 557 अंकांनी वाढत 23907 वर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांचे बाजारभांडवलमूल्य मात्र मागच्या आठवड्यात घसरलेले दिसून आले.
एचयुएल, भारती एअरटेल, एसबीआयचे मूल्य वधारले
हिंदुस्थानचे युनिलिव्हरचे बाजारमूल्य 13239 कोटीनी वाढत 5 लाख 74 हजार 569 कोटी तसेच आयटीसीचे मूल्य 11508 कोटीने वाढत 5 लाख 94 हजार 372 कोटी रुपयांवर पोहोचले.दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजारभांडवल 11 हजार 260 कोटींनी वाढत 8 लाख 94 हजार 68 कोटी रुपयांवर तर एसबीआयचे मूल्य 10 हजार 709 कोटीनी वाढत 7 लाख 28 हजार 293 कोटी रुपयांवर पोहोचले.
यांचे बाजार भांडवल तेजीत
एचडीएफसी बँकेचे बाजारभांडवलमूल्य 40392 कोटी रुपयांनी वाढत 13लाख 34 हजार 418 कोटी रुपयांवर पोहोचले. यासोबत आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे बाजारमूल्य 36 हजार 36 कोटीने वाढत 15 लाख 36 हजार 149 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. यासोबतच आयसआयसीआय बँकेचे मूल्य 16 हजार 266 कोटींसह 9 लाख 1 हजार 866 कोटी, इन्फोसिसचे 16 हजार 189 कोटींनी वाढत 7 लाख 90 हजार 151 कोटी रुपयांवर पोहोचले होते.