8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.60 लाख कोटींनी घसरणीत
रिलायन्सला बसला सर्वाधिक फटका : बाजार होता नकारात्मक कल
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहा पैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 60 हजार 314 कोटी रुपये इतके घटले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा बाजारातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे.
बाजारातील अनिश्चिततेचा फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. मागच्या आठवड्यात शेअर बाजारातील कामकाजाचा विचार करता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1047 अंकांनी म्हणजेच 1.30 टक्के इतका घसरला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि आयटीसी यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरण पाहायला मिळाली. याच दरम्यान विरुद्ध बाजूला पाहता आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांनी मात्र बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ करण्यात यश मिळवले होते.
यांचे बाजार भांडवल कमी झाले...
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 59,799 कोटी रुपयांनी कमी होत 18 लाख 64 हजार 436 कोटी रुपयांवर घसरले होते. यासोबत आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 30,185 कोटी रुपयांनी कमी होत 9 लाख 90 हजार 15 कोटी रुपये तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 27 हजार 62 कोटींनी कमी होत 14,46,294 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 18 हजार 429 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 95 हजार 584 कोटी रुपयांवर तर वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 13 हजार 798 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 36 हजार 927 कोटी रुपयांवर घसरले होते. एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 8321 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 29 हजार 972 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 2138 कोटी रुपयांनी कमी होत 10 लाख 53 हजार 891 कोटी रुपयांवर घसरले.
यांचे बाजार मूल्य वाढले...
हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य मात्र 2537 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख ते 48 हजार 382 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा 415 कोटी रुपयांनी वाढले होते.