मार्करम-बवुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
मार्करमचे नाबाद शतक, बवुमाची संयमी अर्धशतकी खेळी : जिंकण्यासाठी 69 धावांची गरज
वृत्तसंस्था/ लंडन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अनपेक्षितपणे पुनरागमन करताना विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. अॅडम मार्करमचे नाबाद शतक व कर्णधार टेंबा बवुमाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियास हार मानण्यास भाग पाडले आहे. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचे टार्गेट दिल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 2 गडी गमावत 213 धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना अद्याप 69 धावांची गरज असून मार्करम 102 तर बवुमा 65 धावांवर खेळत होते.
येथील लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी 282 धावांचे आव्हान दिले आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत 28 विकेट्स पडल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 250 धावांच्या पुढे आपली आघाडी वाढवली. दिद्यमान विजेत्या ऑसींची देहबोली पाहून त्यांनीही हार पत्करली असल्याचे दिसतेय. टेम्बाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले तरीही तो देशाला 27 वर्षानंतर आयसीसी स्पर्धा जिंकून देण्यासाठी मैदानावर उभा राहिला. मार्करमने झुंजार व अविस्मणीय शतकी खेळी केली.
कागिसो रबाडाने ( 5-51) भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर गुंडाळला. त्याला मार्को यान्सेनची (3 विकेट्स) साथ मिळाली. पण, पॅट कमिन्सने 6 विकेट्स घेत आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांवर गुंडाळून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातही अवस्था 7 बाद 73 अशी झाली होती. अॅलेक्स केरी (43) व मिचेल स्टार्क यांनी 85 चेंडूंत 61 धावांची भागीदारी करून संघाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर स्टार्क शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला. त्याने नॅथन लियॉनसह 14 व जोश हेझलवूडसह 59 (135 चेंडू) धावांची भागीदारी केली. यामुळे कांगारुंनी 7 बाद 73 वरून 207 धावांपर्यंत मजल मारली आणि आफ्रिकेसमोर 282 धावांचे आव्हान ठेवले. स्टार्क 136 चेंडूंत 5 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला. रबाडाने दुसऱ्या डावातही 4 विकेट्स घेतल्या तर लुंगी एनगिडीने 3 विकेट्स मिळवल्या.

आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला सलामीवीर रिकेल्टन व मार्करम या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, रिकेल्टनला स्टार्कने 6 धावांवर बाद केले. मुल्डरने 5 चौकारासह 27 धावा केल्या. पण तोही फार काळ टिकला नाही. स्टार्कने त्याला माघारी धाडत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. यानंतर मार्करमला कर्णधार बवुमाने चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 143 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले आहे. मार्करमने नाबाद शतक झळकावताना 11 चौकारासह 102 धावा केल्या. बवुमाने त्याला साथ देताना नाबाद 65 धावांची खेळी साकारली. या जोडीने तिसऱ्या दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 56 षटकांत 2 गडी गमावत 213 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज फॉर्ममध्ये नव्हते, विशेषत: मिचेल स्टार्क खूप महागडा ठरला, त्याने सुमारे 6 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. पण, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही विकेटही घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 212 व दुसरा डाव 65 षटकांत सर्वबाद 207 (लाबुशेन 22, स्टीव्ह स्मिथ 13, अॅलेक्स केरी 43, मिचेल स्टार्क नाबाद 58, हेजलवूड 17, रबाडा 4 तर एन्गिडी 3 बळी).
दक्षिण आफ्रिका पहिला डाव 138 व दुसरा डाव 56 षटकांत 2 बाद 213 (मार्करम 159 चेंडूत 11 चौकारासह नाबाद 102, रिकेल्टन 6, मुल्डर 27, बवुमा खेळत आहे 5 चौकारासह 65, मिचेल स्टार्क 2 बळी).
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघात घडला असून विमानातील 265 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी अहमदाबाद विमान अपघात प्रकरणावर शोक व्यक्त केला आहे. या दोन्ही संघांतील सर्व खेळाडूं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात काळ्या पट्ट्या घालून मैदानावर उतरले होते.
नवा चॅम्पियन मिळण्याचे संकेत
टेम्बा बवुमाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय अगदी योग्य ठरल्याचे दिसत आहे. पहिल्या दोन दिवसाच्या खेळात गोलंदाजांचा दबदबा राहिला. पण पहिल्या दोन दिवसाच्या खेळात ज्या प्रमाणे गोलंदाजांना मदत मिळाली तशी मदत तिसऱ्या दिवशी मिळताना दिसली नाही. यामुळे यंदाच्या वर्षी कसोटीत नवा चॅम्पियन पाहायला मिळणार याचे संकेत दिसू लागले आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली होती. गत हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विजेता ठरला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ त्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे.