For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेय नदीकाठाला दुसऱ्यांदा पुराचा वेढा

11:29 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेय नदीकाठाला दुसऱ्यांदा पुराचा वेढा
Advertisement

शेकडो एकरातील भातशेती पाण्याखाली : राकसकोपचा दरवाजा खुला, शेतकरी चिंताग्रस्त

Advertisement

बेळगाव : मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीकाठाला दुसऱ्यांदा पुराचा वेढा आला आहे. नदीकाठावरील शेकडो एकरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषत: दुबार लागवड केलेली भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राकसकोप पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत केला जात आहे. एका दरवाजातून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै मध्यानंतर झालेल्या धुवाधार पावसाने पूरपरिस्थिती ओढवली होती. तब्बल 10 ते 15 दिवस पाणी कायम होते. त्यामुळे पिकांना फटका बसला होता. काही शेतकऱ्यांनी दुबार भात लागवड केली होती. मात्र पुन्हा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

राकसकोपचा एक दरवाजा खुला

Advertisement

दमदार पावसानंतर राकसकोप जलाशयाचा एक दरवाजा खुला केला आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा पावसात वाढ झाल्याने जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे मार्कंडेयच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.   हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जुलै मध्यानंतर आणि ऑगस्ट अखेरीस जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे यंदा मार्कंडेय नदीला दोनवेळा पूर आला आहे. यापूर्वी 2019 मध्ये दोनवेळा पूर आला होता. परिसरातील पिके पाण्याखाली जाऊन मोठा फटका बसला होता. यंदादेखील 2019 च्या महापुराची आठवण झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचा सर्व्हे करून भरपाईसाठी प्रयत्न होणार का? हेच पहावे लागणार आहे.

मार्कंडेय नदीला दोनवेळा पूर

कंग्राळी बुद्रुक : गेले चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठ परिसरातील भात पिके पाण्याखाली गेली आहेत. पूर लवकर ओसरला नाही तर काही शेतकऱ्यांना तिबार भातरोप लागवड तर काही शेतकऱ्यांना दुबार भातरोप लागवड करावी लागणार आहे. एकंदर पावसाने शेतशिवार जलमय झाले असून भांगलणीची कामे खोळंबली आहेत. जुलैमध्ये मार्कंडेय नदीला महापूर आला होता. राकसकोपमध्येही मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे उर्वरित पाणी बाहेर जाण्यासाठी प्रशासनाला चारही दरवाजे उघडावे लागले होते. यामुळे मार्कंडेय नदीला महापूर आला होता. यामुळे पूर येण्यापूर्वी भातरोप लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे तसेच भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे भात पीक कुजून गेले होते. जवळजवळ 25 दिवसांनी पूर ओसरल्यानंतर पहिली रोप लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दुबार रोप लागवड करावी लागली तर काही शेतकऱ्यांना प्रथम रोप लागवड करून घेतली परंतु सध्या तीन-चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. यामुळे दुबार लागवड केलेले भात पीकही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.