For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेय नदी झाली आता प्रवाहीत

10:24 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेय नदी झाली आता प्रवाहीत
Advertisement

अति पावसाचा परिणाम : शेतकरी वर्गातून समाधान : मार्कंडेय नदीच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मृग नक्षत्राच्या मुसळधार पावसामुळे कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अगसगा, गौंडवाड, यमनापूर पसिरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तलाव व नाले तुडुंब भरून वाहात आहेत. तसेच कंग्राळी बुद्रुक कंग्राळी खुर्द भागातून वाहणारी मार्कंडेय नदी प्रवाहीत झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी ऐन पावसाळ्यात सुद्धा नदी कोरडी पडलेली दिसत होती. यामुळे पावसासाठी शेतकरी वर्गाचे डोळे कायम आकाशाकडे लागून राहिले होते. शेवटपर्यंत पावसाने शेतकरी वर्गाला सहानुभूती दाखविलीच नाही. यंदा मात्र अवकाळी पावसानेही चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गाची पेरणीपूर्व मशागतीची कामे करायला अनुकूल झाले. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सात जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. अन् मृग नक्षत्राने प्रारंभीपासून दमदार पावसाला सुरुवात केल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तालुक्यातील तलाव व नाले प्रवाहीत झाले आहेत. पश्चिम भागातही जोरदार ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे राकसकोपपासून पूर्वेकडे वाहणारी मार्कंडेय नदीचे पात्र प्रवाहीत झाले आहे.

Advertisement

मार्कंडेय नदीपात्र व्यवस्थित करण्यासाठी लाखो रु. खर्च

तालुक्याच्या पश्चिमेकडून राकसकोप जलाशयापासून पूर्वेकडे हिडकल जलाशयाला जाऊन मिळणाऱ्या मार्कंडेय नदी भागातील शेतकऱ्यांकडून झालेले अतिक्रमण हटाव व नदीचे पात्र वाचविण्यासाठी प्रत्येक वर्षी शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार कामगारांना काम मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु मार्कंडेय नदी परिसरातील अतिक्रमण हटविण्यास शासन कमी पडत आहे. यामुळे ‘खड्डे काढा अन् खड्डे बुजवा’ असा शासनाचा आंधळा कारभार चालत आहे. याला जबाबदार कोण शासन, लोकप्रतिनिधी की सामान्य नागरिक असेही विचार ऐकवयास मिळत आहेत.

अतिक्रमणामुळे मार्कंडेय नदी पात्राला ओढ्याचे स्वरुप

मार्कंडेय नदी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत असलेल्या अतिक्रमणामुळे मार्कंडेय नदीच्या पात्राला सध्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाटबंधारे खाते दप्तरी नदीच्या रुंदीची नोंद आहे. या नोंदीनुसार नदीच्या पात्राची रुंदी वाढवून मार्कंडेय नदीचे स्वरूप व वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पाटबंधारे खाते याकडे दुर्लक्ष करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तसेच गोरगरीब शेतकरीवर्गाला आर्थिक मदतीचा हात पुढे करत नदीपात्राची खोदाई करून नदीचे वैभव प्राप्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. रोजगार हमी योजनेच्या नावाखाली प्रत्येक वर्षी शासनाच्या लाखो रुपयाचा चुराडा होत आहे. याला जबाबदार कोण अशा प्रतिक्रिया मार्कंडेय नदी व पर्यावरणप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

Advertisement
Tags :

.