मुसळधार पावसामुळे ‘मार्कंडेय’ पूर्णक्षमतेने प्रवाहित
विहिरींच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ
वार्ताहर /उचगाव
बेळगाव पश्चिम भागातील आणि पूर्वभागातून वाहणारी अनेक शेतकरी आणि नागरिकांची जीवनदायीनी ठरलेली मार्कंडेय नदी पूर्णक्षमतेने प्रवाहित झाली आहे. या नदीच्या कार्यक्षेत्रात राकसकोप, बेळगुंदी, उचगाव परिसरात मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे मार्कंडेय सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याचे चित्र रविवार दि. 15 जूनपासून दिसून येत आहे. पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार वृष्टी झाल्याशिवाय मार्कंडेय नदीतील पात्रामध्ये पूर्णक्षमतेने पाणी वाहत नाही. आता गेल्या आठवड्यात पावसाची संततधार सुरू असल्याने तसेच मार्कंडेय नदीच्या पश्चिम भागातील कार्यक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात ओलावा निर्माण झाल्याने या भागातील पाणी सध्या हळूहळू या नदीच्या पात्रात जमत गेले. सध्या मार्कंडेयच्या पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन ती पूर्ण क्षमतेने वाहू लागली आहे.
मागील तीन वर्षाचा आढावा पाहता यावर्षी मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी लवकर वाहू लागले आहे. 2023 साली 12 जुलैला मार्कंडेय नदीच्या पात्रातून पाणी वाहत होते. 2024 साली 1 जुलै रोजी मार्कंडेय नदीच्या पात्रातून पाणी वाहत होते. मात्र 2025 चालूवर्षी 15 जूनपासून म्हणजेच जवळपास 14 दिवस अगोदरच नदी पूर्णक्षमतेने प्रवाहित झाली आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रातून पाणी वाहू लागल्याने नदीच्या दुतर्फा पसरलेल्या अनेक गावातील तसेच शेतकऱ्यांच्या शेतवडीतील विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न आता पूर्णत: मिटला आहे. यावर्षीचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गेल्या चार-पाच दिवसात पडत असलेल्या पावसामुळे शेतवडीत काही ठिकाणी पाणी साचल्याचेही दिसून येत आहे. शेतीच्या हंगामाला सदर पाऊस पूरक असल्याने शेतीच्या अनेक बी बियाण्यांच्या पेरणीला, रोप लागवडीला आता जोर आला आहे. नदीच्या पात्रातून आता पाणी वाहू लागल्याने या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांतून समाधानाचे चित्र दिसून येत आहे.