For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेय तळाला...चिंता शेतकऱ्यांना!

10:33 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेय तळाला   चिंता शेतकऱ्यांना
Advertisement

नदीकाठच्या पिकांना धोका : येत्या काही दिवसांत बिकट परिस्थिती : विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी घट

Advertisement

बेळगाव : तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेय नदी हिंडलगा परिसरात कोरडी पडली आहे. जानेवारीपासूनच परिसरातील शेतीसाठी पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत पाणी समस्या आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे, हे चित्र स्पष्ट होवू लागले आहे. मार्कंडेय नदीकाठी शिवार असलेल्या बैलूर, बेळवट्टी, राकसकोप, बेळगुंदी, सोनोली, बाची, कल्लेहोळ, उचगाव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, जाफरवाडी, कडोली, गौंडवाड, काकती, होनगा आदी गावांना नदी जीवनदायिनी ठरली आहे. मात्र गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी लवकरच कमी झाली आहे. विशेषत: नदीकाठी असलेल्या तलाव, विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शिवारातील पिके पाण्याविना धोक्यात येवू लागली आहेत.

बंधारा घातल्याने काही प्रमाणात पाणी

Advertisement

हिंडलगा पुलावर पाणी अडविण्यासाठी बंधारा घालण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी पाणी नसल्याने बंधारा कोरडा पडला आहे. तर उचगाव आणि कंग्राळी परिसरात बंधारा घातल्याने काही प्रमाणात पाणी दिसून येत आहे. मात्र इतर ठिकाणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे नदीकाठी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या तोंडावरच नदीची पाणीपातळी तळाला गेल्याने उन्हाळ्यात पाण्याचे चटके अधिक सहन करावे लागणार आहेत, हे स्पष्ट होवू लागले आहे. नदीकाठी ऊस, ज्वारी, मका, बटाटा, रताळी, मिरची यासह भाजीपाला पिकविला जातो. त्यामुळे हिवाळ्यापासून नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. विशेषत: नदीतील पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या विहिरींची पाणी पातळीही टिकून असते. मात्र यंदा नदीनेच तळ गाठल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे नदीकाठी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Advertisement
Tags :

.