ऐन दसऱ्याच्या तोंडावर झेंडूचे दर घसरले
वाळवा :
रुपये ऐन नवरात्रीच्या, सणासुदीच्या तोंडावर मुंबई मार्केटमध्ये झेंडूचा दर २० रुपये किलो झाला आहे. २४ सप्टेंबरला किलोला ८० ते १०० असणारा दर वीस रुपयांवर गेल्यामुळे शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे, मुंबई मार्केटमध्ये बेंगलोरचा झेंडू आल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर पडले आहेत. वाळवा तालुक्यातून दररोज झेंडू गुलाब, शेवंतीची १० टन फुले मुंबईला जातात.
झेंडू, गुलाब, शेवंती या फुलांचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर ही फुले किमान ५० रुपये किलोने जायला पाहिजेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना झेंडू, गुलाब, शेवंती पासून चांगला दर मिळेल. अशी अपेक्षा असतानाच अचानक झेंडूच्या फुलांचा दर २० रुपये किलोवर आला आहे. गुलाबाची फुले २० ते ३० रुपये डझन जात आहेत. शेवंतीची फुले दीडशे ते दोनशे रुपये किलोने कालपर्यंत जात होती. त्यांचा दर ८० ते १०० रुपयापर्यंत खाली आला आहे. शेतकऱ्यांनी महाग औषधे, बी बियाणे आणून तळ हाताच्या फोडाप्रमाणे पिकांना जपून, मोठ्या प्रमाणात खर्च करून काय उपयोग? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.
मुंबई येथील फुलांचे व्यापारी विठ्ठल लोखंडे म्हणाले, बेंगलोरच्या फुलांचे दहा ट्रक मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे फुलांचे दर पडले आहेत. हे अनपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. वाळवा येथील सुवर्णा फ्लॉवरचे गजानन पवार म्हणाले, झेंडूचा दर २० रुपये झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. शेतकरी आणखी कर्जबाजारी होणार आहेत. शासनाने व व्यापाऱ्याने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तरच फुल शेती परवडणार आहे.