महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या धर्मगुरुंवरील आरोपांचा मडगाव काँग्रेसकडून निषेध

01:15 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून आपले अपयश व चुकीची गणना लपविण्याचा प्रयत्न : सावियो कुतिन्हो

Advertisement

मडगाव : भाजप नेत्यांनी धर्मगुरुंवर केलेल्या असंबद्ध आणि निराधार आरोपांचा निषेध करताना मडगाव काँग्रेस गटाने आरोप केला आहे की, भाजप आपले अपयश आणि चुकीची गणना लपविण्यासाठी असे प्रयत्न करत आहे. मडगाव काँग्रेसचे नेते सावियो कुतिन्हो यांनी दावा केला की, मतदानानंतर लगेचच दक्षिण गोव्यातील 20 विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व प्रमुखांना फक्त मतदान केलेल्या ख्रिस्ती आणि मुस्लिमांची संख्या मोजण्याचे आणि पडताळून पाहण्याचे निर्देश देण्यात आले होते. एकूण मतांमधून अल्पसंख्याकांची 80 टक्के मते वजा करायची आणि त्यानंतर 10 ते 15 टक्के फरक कमी करायचा हा भाजपने स्वीकारलेला फॉर्म्युला होता. बहुसंख्य समाजातील केवळ 10 ते 15 टक्के लोक काँग्रेसला मतदान करतील अशी भाजपची धारणा होती, दुर्दैवाने त्यांना त्यात धक्का बसला. बहुसंख्य समाजाच्या मतदारांनी भाजपच्या फुटीरतावादी अजेंड्याला कंटाळून काँग्रेस उमेदवाराला मतदान केले, असे कुतिन्हो म्हणाले.

Advertisement

कुतिन्हो यांनी दक्षिण जिल्हा काँग्रेसचे सदस्य अनिल आल्वारीस, लालन पार्सेकर, सदस्य अन्वर नारू, कामिलो कामारा, सुजाता पार्सेकर, डॉमनिक कुतिन्हो, इफ्तियाज सय्यद, दामोदर वंसकर आणि इतरांसमवेत ही पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रभारी यांनी दक्षिण गोव्यातील भाजपच्या विजयाबद्दल बढाई मारत केलेल्या विविध विधानांचा तपशील देत कुतिन्हो म्हणाले की, मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना अपेक्षित मतांच्या गणनेच्या सूत्रावर इतका विश्वास होता की, दक्षिण गोव्यातील एक्झिट पोलचे निकाल चुकीचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मडगावमध्ये अल्पसंख्याकांची संख्या जास्त नाही, मग काँग्रेसला 10 हजार मते कशी मिळाली, असा सवाल त्यांनी केला. 40 पैकी 18 बुथांवर काँग्रेसने आघाडी मिळवली, ज्यामुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी वर्तविलेली आघाडी भाजपला मिळू शकली नाही, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले.

बिनबुडाच्या आरोपासाठी कोणत्या देवाचा सल्ला घेतला?

निवडणूक होऊन पंधरवडा उलटल्यानंतरही दक्षिणेत जिंकण्याचा एवढा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री आणि भाजपने धर्मगुरूंवर बिनबुडाचे आरोप करण्यासाठी कोणत्या देवाचा सल्ला घेतला, असा सवाल यावेळी करण्यात आला. कुतिन्हो म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या एका वर्ष पूर्वी धर्माच्या आधारे लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवण्यात आली. मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार लोकांना भडकविण्यासाठी आंदोलनात कसे सहभागी होत होते हे देखील आम्ही पाहिलेले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

ध्रुवीकरणाचे प्रयत्न उलटले

गोवा हे नेहमीच शांतताप्रिय राज्य राहिले आहे आणि लोकांनी धर्माची पर्वा न करता एकोप्याने राहणे पसंत केलेले आहे. तरीही बहुसंख्य समाजाच्या लोकांचे आपल्या दिशेने ध्रुवीकरण करण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील, असा विश्वास भाजपला होता. परंतु भाजपवर त्यांच्याकडून जोरदार पलटवार झाला आणि त्यात भर म्हणून उमेदवाराच्या निवडीमुळे भाजपच्या सर्व योजना धोक्यात आल्या, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article