घोडीच्या दुधाचे आईस्क्रिम
गाई-म्हशींचे दूध, त्या दुधापासून बनविलेले अनेक पदार्थ, अर्थात दही, ताक, लोणी, तूप, चक्का, खवा, आईस्क्रिम इत्यादी पदार्थ माणूस आवडीने खात आहे. पण अलिकडच्या काळात काही अन्य शाकाहारी प्राण्यांच्या दुधांनाही मोठी मागणी प्राप्त झाली आहे. सध्या गाढविणीचे दूध बरेच लोकप्रिय आहे आणि त्याचे उत्पादन कमी असल्याने त्याची किंमतही 500 रुपये लीटर पासून 2000 रुपये लीटरपर्यंत असल्याची चर्चा आहे. गाढविणीच्या दुधात चरबीचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे ते पचायला हलके असते. विशेषत: मधुमेह आणि रक्तदाब असे विकार असणाऱ्या लोकांकडून या दुधाला मागणी असते. या दुधापासून सौंदर्यप्रसाधनेही निर्माण केली जातात. त्यामुळे अनेकजण गर्दभपालनाकडे झुकत आहेत.
आता घोडीच्या दुधासंबंधीही संशोधकाच्या आधारावर अनेक प्रतिपादन केली जात आहेत. घोडीच्या दुधाचे आईस्क्रिम अत्यंत चवदार आणि पोषक असते, असे प्रतिपादन पोलंड या देशाच्या काही संशोधकांनी केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की गाय किंवा म्हैस यांच्या दुधाच्या आइस्क्रिमपेक्षा घोडीच्या दुधाचे आईस्क्रिम शरिराला अधिक लाभदायक आहे. घोडीच्या दुधात चरबीचे प्रमाण कमी असून लॅक्टोफेरीनचे प्रमाण अधिक असते. लॅक्टोफेरीनमुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. मानवी मातेच्या दुधातही या द्रव्याचे प्रमाण अधिक असते. म्हणून नवजात बालकाला मातेचे दूध निदान एक वर्षभर तरी दिले जावे, असे आधुनिक विज्ञानही सांगते. ज्या बालकांना जन्मल्यानंतर मातेचे दूध मिळत नाही, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते असेही संशोधनात आढळल्याचे सांगितले जाते. घोडीचे दूध हे मानवी मातेच्या दुधाच्या समानच असल्याचेही हे संशोधक म्हणतात. त्यामुळे भविष्यकाळात घोडीच्या दुधालाही मोठी मागणी प्राप्त होईल, अशी शक्यता आहे.