For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संकेश्वरात शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा

12:49 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
संकेश्वरात शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा
Advertisement

एपीएमसीमध्ये भाजी बाजारपेठ भरवा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन

Advertisement

संकेश्वर : भाजी बाजारपेठ राणी चन्नमा मार्केट यार्डात भरवावी. शेतकऱ्यांच्या पाठिशी जिल्हा प्रशासन ठामपणे उभे आहे. शेतकरी या देशाचे दैवत आहेत. त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. ते गुरुवारी राज्य शेतकरी संघटनेच्या आंदोलन सभेत बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख भिमाशंकर गुळेद यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी रोशन पुढे म्हणाले, गणेश चतुर्थीमुळे सदर समस्या निकालात काढणे शक्य झाले नाही. बहुचर्चेत असणारा भाजी बाजारपेठ हा विषय आता संपुष्टात आला आहे. 30 वर्षांपासून दुरदुंडेश्वर कॉम्प्लेक्समध्ये भरविण्यात येणारी बेकायदा भाजी बाजारपेठ बंद करून एपीएमसीमध्ये बाजारपेठ भरविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली होती. सदर मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. असे असले तरी यापुढे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्या नियोजनाला सर्वांनी सहकार्य करावे. शुक्रवारपासून भाजी बाजारपेठ राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भरवावी.शेतकऱ्यांच्या वेदना आपण समजून घेतल्या असून शुक्रवारपासून बाजार एपीएमसी आवारात भरावा, असे स्पष्ट केले. याविषयी आपण श्री शिवलिंगेश्वर स्वामीजी यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकरी हिताचे निर्णय तुम्ही घेऊ शकता, असे स्वामीजींनी सांगितले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख भिमाशंकर गुळेद म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी घेत असलेले उत्पादन आरोग्यासाठी उत्तम आहे. शेतकऱ्यांचे कष्ट आपण जवळून पाहिले आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठिशी आपण ठामपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी दरम्यान, गुरुवारी सकाळी 11 वाजता हुक्केरी येथील आडवी सिद्धेश्वर मठापासून शेतकरी संघटनेच्या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात 110 ट्रॅक्टर ट्रॉली, 10 बैलगाड्या व हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा दुपारी 1 वाजता येथील महात्मा बसवेश्वर सर्कलवर पोहचला. त्यानंतर चन्नमा सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौक व संगोळळ रायण्णा चौक येथे पोहचल्यानंतर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेतर्फे आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.

Advertisement

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजेरी म्हणाले, येथील दुरदुंडेश्वर मठाच्या जागेत चालविण्यात येणारी भाजी बाजारपेठ बेकायदा आहे.  मठाची जागा असल्यामुळे 30 वर्षात कोणीच काहीही बोलले नाही. मात्र भाजीपाला उत्पादकांची मोठ्या प्रमाणात केलेली आर्थिक लूट, दमदाटीपणा असह्य झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी लढावे लागले. शेतकरी सुरक्षित व त्यांच्या मालाला मिळणारी किंमत योग्य असावी हे साहजिक धोरण आहे. भाजी उत्पादक शेतकऱ्यांची नाहक लूट थांबविण्यासाठीच सरकारच्या एपीएमसीमध्ये भाजी बाजारपेठ भरवावी व शेतकऱ्यांना सुरक्षित करावे, ही आमची मागणी आहे. भाजी बाजारपेठेतून आतापर्यंत 250 कोटी रुपयांची लूट झाली असून वर्षाकाठी 11 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार नवीन जागेतच भाजी बाजारपेठ स्थलांतर होणार असल्याने उपस्थित शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार मंजुळा नायक, उपतहसीलदार सी. ए. पाटील, जिल्हा एपीएमसीचे संचालक एम. बी. यबनूर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.