मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्यावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्या विरोधात मंत्री हेब्बाळकर यांचे समर्थक आणि विविध संघटनांच्यावतीने शनिवार दि. 21 रोजी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. विधानपरिषद सदस्य पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून चन्नम्मा चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
विधिमंडळ अधिवेशन काळात भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने या प्रकाराचा निषेध करत त्यांच्या समर्थकांनी शहरात मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. प्रारंभी क्लब रोड (बी. शंकरानंद मार्ग) येथून सीपीएड मैदानापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आली. त्याठिकाणी आमदार सी. टी. रवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करत दहन करण्यात आले. सी. टी. रवी यांची विधानपरिषदेच्या जागेवरून तात्काळ हकालपट्टी करावी, विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह समजल्या जाणाऱ्या विधानपरिषदेत असे सदस्य नसावेत. सी. टी. रवी यांना बडतर्फ करेपर्यंत राज्यभर आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. मंत्री हेब्बाळकर या राणी चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा यांच्याप्रमाणे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणाऱ्या भाजपच्या विधानपरिषद सदस्याने मंत्री हेब्बाळकर यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप आमदार सी. टी. रवी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसे न केल्यास राज्यभर महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सी. टी. रवी यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने हा संपूर्ण कर्नाटकातील महिलांचा अवमान आहे. चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने जाऊन सी. टी. रवी यांना तात्काळ विधानपरिषद सदस्य पदावरून निलंबित करावे, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याच्यावतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्लब रोड ते चन्नम्मा सर्कल आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते.